कोलकाता : ममता बॅनर्जी आणि धरणं यांचं नातं तसं जुनंच. ममता यांच्या राजकीय उदयाचा पायाच आंदोलनांमधून रोवला गेला. सुरुवातीपासूनच आक्रमक बाणा आणि रस्त्यावरची लढाई ही त्यांची मूळ ओळख राहिली आहे.
नवद्दीच्या दशकात युथ काँग्रेसचं नेतृत्व करत असताना ममता यांनी पहिल्यांदा तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बासू यांच्या दालनाबाहेर धरणं दिलं होतं. एका बलात्कार पीडितेला न्याय देण्यासाठी ममता थेट सरकारचं प्रशासकीय मुख्यालय असलेल्या रायटर्स बिल्डिंगमध्ये घुसल्या आणि आंदोलन सुरु केलं. त्यावेळेस त्यांना पोलिसांकडून जबर मारहाण झाली होती. पण याच आंदोलनानंतर ममता दीदी पहिल्यांदा प्रकाशझोतात आल्या.
त्यानंतर तब्बल तेरा वर्षांनी 2006 साली ममता बॅनर्जी यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्कसिस्ट) तत्कालीन मुख्यमंत्री बुधदेव भट्टाचार्जी यांच्या डाव्या आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन उभारलं. कारण होतं शिंगुरमधल्या शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन टाटा मोटर्सच्या नॅनो प्लांटला देण्यास विरोध. यावेळेस दीदींचं धरणं कोलकात्याच्या धरमतल्ला परिसरात तब्बल 26 दिवस चाललं. त्यानंतर 2007 साली नंदीग्राम मध्ये प्रस्तावित पेट्रोलियम हबच्या विरोधात मोठा लढा उभारला आणि 2011 च्या निवडणुकीत डाव्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागली.
मात्र आज 2019 ला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदावर असूनही ममता दीदींनी सीबीआयच्या कारवाईविरोधात पुन्हा एकदा धरणंअस्त्र उपसलं आहे. ते ही त्याच धरमतल्लाच्या मेट्रो सिनेमा परिसरात. यावेळेस निशाण्यावर केंद्रातलं मोदी सरकार आहे आणि पाठीशी देशभरातली अर्धा डझन विरोधी पक्षांचं कडबोळं. त्यामुळे शिंगुरच्या आंदोलनाने ममता दीदींना मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचवलं, आता मोदी विरोधात सुरु असलेलं धरणं त्यांना पंतप्रधानपदापर्यंतची मजल गाठण्यात मदत करेल, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
ममता बॅनर्जी आणि धरणं!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Feb 2019 10:36 AM (IST)
शिंगुरच्या आंदोलनाने ममता दीदींना मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचवलं, आता मोदी विरोधात सुरु असलेलं धरणं त्यांना पंतप्रधानपदापर्यंतची मजल गाठण्यात मदत करेल, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -