नवी दिल्ली : "माझ्या हिंमतीसाठी मला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही," असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना उत्तर दिलं आहे. "नितीन गडकरी एकमेव भाजप नेते आहेत, ज्यांनी खरं बोलण्याची हिंमत दाखवली आहे," असं ट्वीट करत राहुल गांधींनी गडकरींचं अभिनंदन केलं होतं. तसंच नितीन गडकरी राफेल, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा इतर मुद्द्यांवरही बोलतील, अशी आशा राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती.


त्यावर नितीन गडकरी यांनीही ट्विटरवरच उत्तर दिलं आहे. गडकरी यांनी चार ट्वीट करत राहुल गांधींच्या विविध मुद्द्यांवर उत्तरं दिली आहेत. ते म्हणाले की, "राहुल गांधीजी, माझ्या हिंमतीसाठी मला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही. पण एका पक्षाचा अध्यक्ष असूनही आमच्या सरकारवर हल्ला करण्यासाठी तुम्हाला मीडियाने अतिरंजित केलेल्या वृत्तांचा आधार घ्यावा लागतोय, याचं मला आश्चर्य वाटतंय."


केवळ नितीन गडकरींनी खरं बोलण्याची हिम्मत केली : राहुल गांधी

राफेलवर काय म्हणाले?
"तुम्हाला हल्ला करण्यासाठी खांदे शोधावे लागत आहेत, यातच मोदीजी आणि आमच्या सरकारचं यश आहे. राहिला मुद्दा तुम्ही उचललेल्या मुद्द्यांचा, तर मी छातीठोकपणे सांगू शकतो की, राफेलमध्ये आमच्या सरकारने देशाचं हित समोर ठेवून सर्वात पारदर्शक व्यवहार केला आहे,"  असं गडकरी पुढे म्हणाले.


काँग्रेसच्या धोरणांवर भाष्य
शेतकऱ्यांवरील संकटाविषयी नितीन गडकरी म्हणाले की, "तुमच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना ज्या परिस्थितीत ढकललं, तिथून त्यांना बाहेर काढण्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न मोदीजी करत आहेत आणि आम्हाला यात यशही मिळत आहे. तुमच्यासह काही जणांना मोदी पंतप्रधान झालेलं सहन होत नाही. त्यामुळे तुम्हाला असहिष्णुता आणि घटनात्मक संस्थांवर हल्ला करण्याचं स्वप्न पडतं."


जो आपलं घर सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही : नितीन गडकरी

संस्थांवर हल्ला
संस्थांवरील हल्ल्याबाबतच्या मुद्द्यावर गडकरी म्हणाले की, "आमच्या आणि काँग्रेसच्या डीएनएमध्ये हाच फरक आहे की, आम्ही लोकशाही आणि घटनात्मक संस्थांवर विश्वास ठेवलं. तुमची ही खेळी काम करत नाही. मोदीजी पुन्हा पंतप्रधान बनतील आणि आम्ही मजबुतीने देशाला विकासाच्या शिखरावर पोहोचवू. पण तुम्ही भविष्यात समजूतदारपणे आणि जबाबदारीने वागाल अशी आशा आहे."


राहुल गांधींचं नवं ट्वीट
नितीन गडकरी यांच्या या ट्वीटनंतर काँग्रेस अध्यक्षांनी आणखी एक ट्वीट करुन गडकरींना उत्तर देण्याची विनंती केली. राहुल गांधींनी त्यांच्या आधीच्या ट्वीटला कोट करत नवं ट्वीट केलं. उप्स, गडकरीजी, माफ करा, मी सर्वात महत्त्वाचा मुद्दा विसरलोच.... नोकरी! नोकरी! नोकरी! नोकरी!