नवी दिल्ली :  कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून शालेय शिक्षणाचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. पण काही राज्यं मात्र या स्थितीतून हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. आज राजधानी दिल्लीमध्ये शाळा सुरू करण्यासाठी पहिले पाऊल टाकण्यात आलं आहे.


कोरोनाच्या संकटामुळे ओस पडलेल्या शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी आज दिल्ली सरकारनं टप्प्याटप्यानं सुरुवात केलीय. केवळ दिल्लीच नव्हे तर देशातल्या पाच राज्यांमध्ये शाळा उघडण्याची तयारी सुरू झाली आहे ज्यात तमिळनाडू आणि गुजरातचा देखील समावेश आहे. काही ठिकाणी  काळजी घेऊन नववी ते बारावी तर काही ठिकाणी सहावीपासूनचे वर्ग उघडण्याची तयारी सुरू आहे.


आजपासून दिल्लीत नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आलेत. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत कोरोनाची स्थिती तुलनेनं नियंत्रणात असल्यानं केजरीवाल सरकारनं हा निर्णय घेतलाय. शाळेत येण्यासाठी कुठल्याही विद्यार्थ्याला बंधन नसणार आहे, पालकांची इच्छा असेल तरच विद्यार्थी शाळेत येतील, त्यांची गैरहजेरी मानली जाणार नाही हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. 


मंदिरं, दुकानं यासाठी रस्त्यावर आंदोलन करणारी भाजप दिल्लीत शाळा उघडण्यावरुन मात्र वेगळीच भूमिका घेते. केजरीवाल सरकारचा हा निर्णय घाईचा आणि अत्यंत उथळ असल्याची टीका भाजप दिल्ली अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी केली आहे. दिल्लीत मंदिरं खुली आहेत, पण भाविकांना दर्शनासाठी परवानगी नाही. त्यामुळे मंदिराच्या मुद्द्यावरुन सध्या तरी फारसा वाद नाही. पण शाळा उघडण्यावरुन मात्र दिल्ली भाजपमध्येच मतमतांतरं असल्याचं दिसतंय. 


 गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटानं शिक्षणव्यवस्था विस्कळीत झाली आहे. परीक्षा वेळेवर होत नाहीत, ऑनलाईन क्लासेस सगळ्याच थरापर्यंत नीट पोहचत असं नाही. 


अर्थात शाळा सुरु करताना काही विशिष्ट नियमावलीचंही भान राखण्यात आलंय



  • 50 टक्के क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वर्गात नसतील

  • प्रत्येक विद्यार्थ्याचं थर्मल स्क्रीनिंग केलं जाईल

  • शाळेतल्या दोन शिफ्टमध्ये किमान एक तासांचं अंतर असेल, जेवणाच्या वेळा विभागल्या जातील 

  • शाळेत कुठल्याही अनावश्यक व्यक्तीला प्रत्यक्ष प्रवेश नसेल


 दिल्लीत कोरोनाची स्थिती सध्या तुलेननं नियंत्रणात आहे. रविवारी दिल्लीत केवळ 31 रुग्ण सापडले तर एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती. दिल्लीप्रमाणेच तामिळनाडू, गुजरातसारख्या एकूण 5 राज्यांतही आजपासूनच शाळा टप्प्याटप्यानं सुरु होत आहेत.  एकीकडे तिसऱ्या लाटेचं भय सतावत असतानाच खबरदारी आवश्यक आहेच, पण जगण्याचा संघर्ष ही अटळ असल्याने सरकारं त्यातून मार्ग काढत हे पाऊल उचलत आहेत.