नवी दिल्ली : देशातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने ई- श्रम पोर्टल सुरु केलं आहे. विशेषत: कोरोना काळात असंघटित क्षेत्रातील कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. भविष्यात त्यांना अशा प्रकारे पुन्हा अडचणींना सामोरं जावं लागू नये यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे. 


बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते आणि घरगुती कामगार आणि इतर अनेक कामगार हे आपली नोंदणी करू शकतात. यामध्ये नोंदणी केल्यानंतर, कामगारांना 12 अंकी नंबरचे लेबर कार्ड (Labour Card) दिले जाईल .त्या कार्ड वर त्या व्यक्तीचे नाव, व्यवसाय, पत्ता, शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि कौटुंबिक माहिती असे डिटेल असेल. या कार्डमुळे कामगारांना भविष्यात सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेण्यास मदत होईल.


या पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत एक वर्षासाठी अपघाती विमाही मिळेल. यासोबतच  महामारीसारख्या काळात केंद्र सरकार आणि राज्य सरकार कामगारांसाठी बऱ्याच सुविधा प्रदान करू शकतील. 26 ऑगस्टपासून या पोर्टलवर नोंदणी सुरू झालेली आहे.


ई-श्रम ( E-Shram) पोर्टलवर बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावर विक्रेते, घरगुती कामगार, दूधवाला, ट्रक चालक, मच्छीमार, कृषी कामगार आदि असंघटित कामगारांचा समावेश असेल. 


ई-श्रम पोर्टलवर अशी नोंदणी करा


1. ई-श्रम पोर्टलमध्ये नोंदणी करण्यासाठी, सर्वप्रथम  https://eshram.gov.in या लिंकवर भेट द्या.
2. यानंतर  Register on e-shram वर क्लिक करा.
3. समोर आलेल्या self Resistration Block मध्ये तुमच्या आधार कार्डची नोंद करा.
3. त्यानंतर देण्यात आलेला अचूक कॅप्चा कोड भरा.  नंतर आपला मोबाईल नंबरची नोंद करुन त्यावर आलेला ओटीपी नंबर भरा, नंबर व्हेरिफाय करून घ्या.
4. पुढील पेजवर तुमची वैयक्तिक माहिती भरा.
5. सर्व माहिती भरून झाल्यानंतर Register बटणावर क्लिक करा.


ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी आपले ओळखपत्र, आधार कार्ड, बँक खाते पासबूक किंवा बॅंक डिटेल, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो असणं अनिवार्य आहे.


जर एखाद्या कामगाराचे आधार कार्ड मोबाईलला कनेक्ट नसेल तर जवळच्या कम्युनिटी सर्व्हिस सेंटरला भेट द्या आणि बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन प्रक्रिया पूर्ण करा. यानंतरही जर काही समस्या आली तर 14433 हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. त्यावर कॉल करुन आपल्या समस्येचं निवारण करता येईल.


ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित कामगाराला 12 अंकी युनिक नंबर असलेले ई-श्रम कार्ड देण्यात येईल. त्याच्या मदतीने या कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या सर्व योजनांच्या अंतर्गत आणण्यात येणार आहे. 


अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाखांचा विमा
ई-श्रम पोर्टलवर सर्व राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंद करावी असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास केंद्र सरकारकडून त्यांच्या वारसांना दोन लाख रुपयांच्या विम्याचे कवच देण्यात येणार आहे. तसेच अपघातात कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.


महत्वाच्या बातम्या :