आपण विकसित करत असलेली लस ही ब्रॉड-स्पेक्ट्रम प्रकारातील आहे. ही लस वेगवेगळ्या सर्व म्युटेशनवर परिणामकारण ठरणारी असेल. जर आपल्याला काही गंभीर बदल असल्याचे आढळले तर आपल्याला सध्याच्या लसीची कार्यक्षमता निश्चित करण्यासाठी फक्त नवी चाचणी करावी लागेल, असं पूनावाला यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
विषाणूमधील म्युटेशन चिंतेचा विषय
अनेक देश एकीकडे नोवेल कोरोना वायरसवर लस विकसीत करण्याच्या अंतिम टप्यात असल्याचा दावा करत असताना किंवा लस विकसित झाल्याचा दावा करत आहेत. मात्र दुसरीकडे काही देशांची शास्त्रज्ञ मंडळी कोविड-19च्या मूळ विषाणूमध्ये म्युटेशन होत असल्यामुळे म्हणजे उत्क्रांती (रचनात्मक बदल) होत असल्यामुळे काळजी व्यक्त करत आहेत. बदललेला दुसरा विषाणू जास्त संर्सगजन्य असून तो कदाचित जास्त घातक ठरत असल्याची चिंता देखील शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.
48 टक्के भारतीय विषाणू प्रकारांमध्ये उत्क्रांती
भारतातील दिल्ली स्थित CSIR – IGIB संस्थेचे डॉ. विनोद स्कारिया व ऑस्ट्रेलियातील CSIROचे मूळ भारतीय असलेले शास्त्रज्ञ प्रा. एस.एस. वासन यांनी भारतातले कोरोनाचे 82 जिनॉमिक सिक्वेंन्स अभ्यासले. यातील 48 टक्के भारतीय विषाणू प्रकारांमध्ये उत्क्रांती (रचनात्मक बदल) झाल्याचे आढळून आले आहेत, अशी निरिक्षणं दोघांनी मांडली आहेत.
घातक रोगजन्य विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या प्रा.वासन यांच्यामते लॉकडाऊन हळूहळू काढताना दोन बाबी महत्वाच्या आहेत. पहिली म्हणजे या विषाणूत होणाऱ्या म्युटेशनवर लक्ष ठेवणे आणि दुसरी बाब म्हणजे कोविड-19वर ज्या लसी विकसित होत आहेत त्या रूग्णांना मॉनिटर करणे गरजेचे आहे.
याशिवाय जगभरातील 7167 जिनॉमिक सिक्वेंन्स अभ्यासले असता त्यापैकी दोन तृतीअंश स्ट्रेन्स म्हणजे 66 टक्के प्रकारांमध्ये उत्क्रांती झाल्याचे ऑस्ट्रेलियाच्या CSIROचे प्रमुख डॉ. डेनिस बॉअर यांनी सांगितले. कोरोना विषाणूमधील स्पाईक प्रोटिन ज्याला D614G असे संबोधले जाते, यात उत्क्रांती झाली जी खूप संसर्गजन्य आहे. ही बाब चिंतेची असल्याचे शास्त्रज्ञ मानतात.
बदल अत्यंत घातक असू शकतो?
तर 717 ऑस्ट्रेलियन जिनॉम सिक्वेंसेसवरच्या अभ्यासाप्रमाणे 50 टक्के विषाणू प्रकारांमध्ये म्युटेशन म्हणजे उत्क्रांती झाल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे CSIRO च्या शास्त्रज्ञांनी पहिल्या 181 म्युटेशन झालेल्या जिनॉम सिक्वेंसेसचा अभ्यास ट्रांन्सबाऊन्ड्री अॅन्ड इमर्जींग डिसीज या जर्नलमध्ये प्रसिद्ध केला. मात्र हा अभ्यास प्रसिद्ध करण्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या कोविड-19 बाधित रूग्णांच्या विषाणूत पूर्वी म्युटेशन जाणवले नव्हते म्हणून नंतर लक्ष ठवून होतो असेही दोघांनी सांगितले.
याशिवाय अमेरिकेच्या लॉस अलामोस नॅशनल लॅबॉरटरीच्या शास्त्रज्ञांनी तसंच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या डॉ. तन्मय भट्टाचार्य यांनी देखील कोरोना विषाणूत होणाऱ्या म्युटेशन म्हणजे रचनात्मक बदलामुळे काळजी व्यक्त केली आहे. SARS-CoV-2 वायरस म्हणजे कोविड-19 विषाणूत होणारा बदल अत्यंत घातक असू शकतो. हा दूसरा व्हायरस जास्त संसर्गजन्य असल्याची चिंता देखील त्यांना वाटते.