FSSAI Investigation : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने देशभरातील किचन मसाले आणि बाळ अन्न (बेबी फूड) तपासण्याचा निर्णय घेतला आहे. FSSAI देशभरातील सर्व ब्रँडच्या मसाला उत्पादनांचे नमुने गोळा करेल आणि त्यांची चाचणी करणार आहे. नुकतेच देशातील दोन नामांकित मसाल्यांमध्ये सापडलेल्या कीटकनाशकांमुळे (पेस्टिसाइड) हे पाऊल उचलण्यात आले आहे. सिंगापूरच्या फूड एजन्सीला एका मसाल्याच्या फिश करी मसाल्यामध्ये इथिलीन ऑक्साईड सापडले होते. यानंतर सिंगापूरमध्ये त्या कंपनीच्या मसाल्यांवर बंदी घालण्यात आली.


सर्व राज्यांच्या अन्न आयुक्तांना आदेश पाठवले 


एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लाइव्ह मिंटला दिलेल्या माहितीनुसार FSSAI ने या संदर्भात सर्व राज्यांच्या अन्न आयुक्तांना आदेश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, या कंपन्यांच्या उत्पादन युनिटमधून हे नमुने गोळा केले जातील. हे पेस्टिसाइड इथिलीन ऑक्साईडची चाचणी करण्यास सक्षम असलेल्या प्रयोगशाळेत पाठवले जातील. तपासासाठी किमान 20 दिवस लागतील. हेच पेस्टिसाइड परदेशी बाजारपेठेत उपलब्ध झाल्याने अलीकडेच देशातील बड्या मसाल्यांच्या ब्रँडवर कारवाई करण्यात आली. तपासात आरोपांची पुष्टी झाल्यास या ब्रँडवर कडक कारवाई केली जाईल, याशिवाय FSSAI ने स्पाइस बोर्ड ऑफ इंडियालाही (Spice Board of India) अलर्ट केले आहे.


हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कारवाई 


हाँगकाँगच्या सेंटर फॉर फूड सेफ्टीने दोन नामांकित आणि घरोघरी दिसणाऱ्या कंपनीच्या तीन आणि अन्य एका कंपनीच्या मसाल्यावर 5 एप्रिल रोजी बंदी घातली होती. या ग्रुपच्या मद्रास करी पावडर, सांबार मसाला पावडर आणि करी पावडर मिश्रित मसाला पावडरवर बंदी घालण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात सिंगापूर फूड एजन्सीने फिश करी मसाल्यावर कारवाई केली होती. ज्या ग्राहकांनी ती खरेदी केली आहे त्यांनी त्याचा वापर करू नये, असेही सांगण्यात आले. यामुळे आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतात.


नेस्लेच्या सेरेलॅकमध्ये अॅडेड शुगर  


याशिवाय नेस्लेच्या सेरेलॅक (Nestle Cerelac) ब्रँडमध्ये अॅडेड शुगर सल्याचा दावाही करण्यात आला होता. पब्लिक आय या स्विस तपास संस्थेने हा दावा केला आहे. संस्थेचे म्हणणे आहे की नेस्ले भारतात जोडलेली साखर असलेली उत्पादने विकत आहे. मुलांना एकाच वेळी दिले जाणारे सेरेलॅकमध्ये 3 ग्रॅम अॅडेड शुगर असते. त्यामुळे FSSAI ने नेस्लेच्या प्रसिद्ध उत्पादन सेरेलॅकचे नमुनेही चाचणीसाठी घेतले आहेत. याशिवाय लहान मुलांची उत्पादने विकणाऱ्या इतर कंपन्यांच्या उत्पादनांचे नमुनेही तपासले जाणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या