बंगळुरु : कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी आज मतदान होत आहे. कर्नाटकची निवडणूक काँग्रेससह भाजपनेही प्रतिष्ठेची केली आहे. काँग्रेसला सत्ता राखण्याचं, तर भाजपला सत्ता खेचून आणण्याचं आव्हान आहे. त्याचवेळी, जेडीएसचं आव्हानही या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना पुरुन उरणार आहे. त्यामुळे कर्नाटकच्या सत्तेची चावी कुणाच्या हाताला लागते, हे 15 तारखेला कळेलच. पण तोपर्यंत कर्नाटकची विभागवार रचना आणि तेथील राजकीय समीकरणं काय आहेत, यावर एक नजर टाकूया :    


भारतातील मोठ्या राज्यांपैकी एक कर्नाटक आहे. सहा भागांमध्ये कर्नाटकची विभागणी केली जाते. बंगळुरु, ओल्ड म्हैसूर कोस्टल कर्नाटक, बॉम्बे कर्नाटक, हैदराबाद कर्नाटक आणि मध्य कर्नाटक असे ते सहा विभाग. या प्रत्येक विभागाचे स्वतंत्र राजकारण आहे.

बॉम्बे कर्नाटक (50/224) : बॉम्बे-कर्नाटक हा भाग लिंगायत समाजाचा गड मानला जातो. 2013 मध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेसला सत्ता मिळण्यात, सर्वाधिक वाटा या भागाचा होता. या भागातील 50 जागांपैकी 2013 साली काँग्रेसने 31 जागांवर विजय मिळवला होता. गेल्या निवडणुकीत येडीयुरप्पा यांची कर्नाटक जनता पक्ष, भाजप आणि काँग्रेस अशा तिरंगी लढत होती. येडीयुरप्पा हे लिंगायत समाजाचे मोठे नेते मानले जातात. त्यामुळे गेल्यावेळी लिंगायत समाजाची मतं तिन भागात विभागली गेली आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला.

आता येडीयुरप्पा भाजपमध्ये परतले आहेत. त्यामुळे इथे यावेळी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत असणार आहे. लिंगायतांची मतं आपल्याला मिळतील, अशी आशा भाजपला आहे. मात्र, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता दिल्याने, त्यांची मतं आपल्याला मिळतील, अशी आशा काँग्रेसला आहे.

या भागात बेळगाव, हुबली-धारवाड, बागलकोट, विजयपुरा आणि गदग जिल्हे येतात. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, महदायी नदीतून गोव्याला पाणी न सोडणं, ऊसाचे दर इत्यादी मुद्दे कायम चर्चेत असतात.

मध्य कर्नाटक (26/224) : मध्य कर्नाटकात शिवमोगा, चित्रदुर्गा, दावणगेरे आणि चिक्कमगलुरु असे चार जिल्हे येतात. मध्य कर्नाटक हा येडीयुरप्पा यांचा गड मानला जातो. मात्र इथेही यावेळी तिरंगी लढत असेल. भाजप, काँग्रेस आणि जेडीएसमध्ये मुख्य टक्कर असणार आहे.

2013 साली भाजप आणि येडीयुरप्पा यांच्यातील दुफळीमुळे मतं विभागली गेल्याने त्याचा फायदा काँग्रेसला झाला होता. त्यामुळे यंदा इथे भाजपच्या आशा वाढल्या आहेत. स्वत: येडीयुरप्पा हे शिवमोगातील शिकारीपुरा येथून रणांगणात आहेत. या भागात मठांची संख्याही मोठी आहे. अमित शाह आणि राहुल गांधी यांनी प्रचाराच्या काळात इथे अनेक फेऱ्या मारल्या. दलित आणि लिंगायत समाजाची संख्या या भागात तुलनेने मोठी आहे.

बंगळुरु (28/224) : बंगळुरु हा शहरी भाग आहे. शहरी भागात भाजप वरचढ आहे. जातीच्या राजकारणापलिकडचे मुद्दे शहरांमध्ये आहेत. 224 पैकी 28 जागा या भागात येतात. याच भागात सिद्धरमय्या सरकारविरोधात लाट दिसून येते.

विकास हा मुद्दा इथे महत्त्वाचा असून, रस्त्यांचा मुद्दा तर कायम ऐरणीवर असतो. त्यामुळे विद्यमान काँग्रेस सरकारवर इथल्या जनतेचा राग आहे. त्यामुळे शहरात राहणाऱ्या गरिबांना आपलंसं करण्यासाठी सिद्धरमय्या सरकारने ‘इंदिरा कॅन्टिन’ची योजना आणली. तसेच, हिंदीविरोधी आणि प्रो-कन्नडा कार्ड हे मुद्देही सिद्धरमय्यांनी इथे आणले.

हैदराबाद कर्नाटक (40/224) : कर्नाटकातील हा भाग अजूनही विकासाच्या प्रतिक्षेत आहे. बल्लारी, कोपल, यादगीर, कलबुर्गी आणि रायचूर जिल्हे या भागात येतात. अल्पसंख्यांक, एससी आणि एसटी समाज बहुतांश असलेल्या या भागात लिंगायत समाजाची संख्याही लक्षणीय आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात 2008 साली रेड्डी बंधूंनी भाजपचा प्रसार करण्यास मदत केली.    

मायनिंग घोटाळ्यातील आरोपी जनार्दन रेड्डी यांच्या नातेवाईकांना या भागात भाजपने सात तिकीटं देण्यात आली आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर रेड्डी यांना प्रचारासाठी बेल्लारीमध्ये प्रवेश करता आला नाही, मात्र चित्रदुर्गाच्या फार्म हाऊसमधूनच त्यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळली. रेड्डी बंधूंमुळे आपल्याला फायदा होईल, असे इथे भाजपला वाटत आहेत. तिकडे, काँग्रेसलच्या मल्लिकार्जुन खरगेंनी या भागात आपल्याच बाजूने इथली जनाता कौल देईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

ओल्ड म्हैसूर (61/224) : ओल्ड म्हैसूर भागात भाजप कमकुवत आहे. या भागात वोक्कालिगा समूहाचं वर्चस्व आहे. वोक्कालिगा समूह हा जेडीएस पक्षाचा पारंपरिक मतदार आहे. त्यामुळे या भागात जेडीएसचं पारडं जड आहे.

मंड्या, म्हैसूर, चिक्कबलापुर, चामराजनगर, हासन, टुमकुर, बंगळुरु ग्रामीण, रामनगरा, कोलार, कोडागु असे एकूण 10 जिल्हे ओल्ड म्हैसूरमध्ये येतात. वोक्कालिगा समूह जेडीएससोबत जाणार हे गृहित धरुन काँग्रेसने ‘AHINDA’ (अल्पसंख्यांक, हिंदू आणि दलित) हा फॉर्म्युला या भागात वापरला आहे.

मंड्या आणि म्हैसूरमध्ये कावेरीचा मुद्दा कायमच चर्चेचा राहिला आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी या मुद्द्यावर मौन बाळगणं पसंत केले आहे. त्यात जेडीएस पक्ष भाजपची बी-टीम असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते एस. एम. कृष्णा हे भाजपमध्ये आल्याने आपल्याला फायदा होईल, अशी आशा भाजपला आहे.

कोस्टल कर्नाटक (19/224) : हिंदुत्त्व कार्ड, भाजप, आरएसस कार्यकर्त्यांच्या हत्या आणि धार्मिक तेढ अशा गोष्टींमुळे हा परिसर कायमच चर्चेत असतो. भाजपने हेच मुद्दे प्रचारादरम्यान अजेंड्यावर ठेवली होती. इथे छोटासा वाद सुद्धा दंगलीत परावर्तित होतो. 2013 साली या भागात भाजपने 19 पैकी 13 जागा जिंक्या होत्या. त्यामुळे हिंदुत्त्व, बीफ बॅन, टीपू सुलतान जयंती, कार्यकर्त्यांच्या हत्या यांसारख्या मुद्द्यांमुळे भाजपला विजयाची आशा आहे, तर अल्पसंख्यांक मतांचा आपल्याला फायदा होईल, या आशेवर काँग्रेस आहे.  

प्रचार कसा झाला?

कर्नाटक विधानसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही कर्नाटकात हजेरी लावली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 सभा घेतल्या, मात्र त्या एकाही मठ किंवा मंदिराची पायरी चढली नाही. त्याचवेळी, अमित शाह हे 33 सभा, 21 रोड शो, 14 मठ-मंदिर आणि एरा गुरुद्वारात गेले होते.

राहुल गांधी हे एकूण 58 सभा, 5 रोड शे, 17 मठ-मंदिर, 3 दर्गा आणि एका चर्चमध्ये गेले होते. तर सोनिया गांधी यांनी एकच सभा घेतली.

आता 15 मे रोजी कर्नाटकातील जनतेने कुणाला कौल दिला आहे, हे समोर येईल.