कर्नाटक विधानसभेसाठी मतदान, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
एबीपी माझा वेब टीम | 12 May 2018 07:51 AM (IST)
विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी हे मतदान होणार आहे. सकाळी 7 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे.
बंगळुरु : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी हे मतदान होणार आहे. सकाळी 7 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. मतदानानंतर 15 मे रोजी म्हणजे मंगळवारी कर्नाटकचा गड कोण जिंकेल हे स्पष्ट होईल. कर्नाटक निवणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर काँग्रेसमोर सत्ता राखण्याचं आव्हान आहे. कारण, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही लढत दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याप्रमाणेच कर्नाटकातील दोन दिग्गज नेत्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरमैय्या हे काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत, तर भाजपने एल येदियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलं आहे. येडियुरप्पा यांनी यापूर्वी भाजपला 2008 साली सत्ता मिळवून दिली होती. कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 222 मतदारसंघात आज मतदान होणार आहे. एकूण 4.98 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 55 हजार 600 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास साडेतीन लाख निवडणूक कर्मचारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी झटत आहेत.