बंगळुरु : बदामी... बदामी रंगाचं गाव. जगाच्या नकाशावर पर्यटनस्थळ म्हणून बदामी प्रसिद्ध आहे. गेल्या 8-15 दिवसांपासून बदामी चर्चेत आहे, कारण इथून कर्नाटकचे विद्यामान मुख्यमंत्री सिद्धरामय्या निवडणूक लढत आहेत.


सिद्धरामय्यांच्या प्रचाराची धुरा विद्यमान आमदार चिमनकट्टींच्या खांद्यावर आहे. ते पॅरालिसिसमुळे फार अँक्टिव नाहीत. पण आता ते गावोगाव फिरत आहेत.

सिद्धरामय्यांसमोरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, तो त्यांच्या उपरेपणाचा. गेल्या पाच निवडणुका त्यांनी चामुंडेश्वरीतून लढवल्यात आणि जिंकल्यात. पण यावेळी सिद्धरामय्यांचा पाडाव करण्यासाठी भाजप, जेडीएस आणि स्वपक्षीयसुद्धा टपून बसलेत. त्यामुळे दगाफटका टाळण्यासाठी कुरबा मतांची व्होटबँक असलेल्या बदामीत त्यांनी सुरक्षित आसरा शोधला आहे.

बदामीऐवजी राज्यातला इतर कुठल्याही मतदारसंघाला पसंती न देण्याचं कारणही तसंच आहे. बदामी मतदारसंघात 2.5 लाख मतदार आहेत. सिद्धरामय्या ज्या कुरबा अर्थात ज्या धनगर समाजातून येतात त्यांची संख्या 55 हजार आहे. दलित मतांची संख्या 46 हजार इतकी आहे. तर मुस्लिम मतं 25 हजाराच्या घरात आहेत. शिवाय 80 हजाराच्या घरात लिंगायत मतं आहेत. त्यामुळे चामुंडेश्वरीऐवजी बदामीतून विजयी होणं सिद्धरामय्यांसाठी सोपं आहे. पण सिद्धरामय्यांची वाट तितकी सोपी नाही. कारण भाजपनं इथं खाणसम्राट जनार्दन रेड्डींचे निकटवर्तीय श्रीरामुलूंना तिकीट दिलं आहे.

46 वर्षांचे श्रीरामुलु बेल्लारी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेत. त्यामुळे बदामीच्या लोकांसाठी ते सिद्धरामय्यांइतकेच उपरे आहेत.

खाणसम्राट आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या जी.जनार्दन रेड्डींचे ते जवळचे मित्र आहेत. श्रीरामुलु हे वाल्मिकी समाजाचं नेतृत्व करतात, त्यामुळे दलित मतांसाठी त्यांचीही बॅटिंग सुरु आहे. बेल्लारीतून जी.जनार्दन रेड्डींना हद्दपार व्हावं लागल्यानंतर श्रीरामुलुंनीच त्यांचा मोर्चा सांभाळला. गोरगरीबांना मदत करणारा नेता अर्थात रॉबिनहूड टाईप इमेज त्यांनी निर्माण केली आहे. अर्थात पैसा प्रसिद्धी कशातच श्रीरामुलु कमी नाहीत.

हायप्रोफाईल लढतीमुळे निवडणुकीचे मुद्दे बाजूला पडले आहेत. जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असूनही गावात पक्का रस्ता नाही. इथं अजूनही नळ अस्तित्वात नाही, बोअरवेलचं पाणी दोन चाकी छकड्यावरुन आणलं जातं. ज्यात महिलांना जीव नकोसा होतो. अनेक गावांमध्ये बसेसचा पत्ता नाही. पर्यटनस्थळ असलं तरी त्याची वास्तपुस्त नीट नसल्यानं तिथंही पुरेसा रोजगार नाही.

चालुक्याचा इतिहास सांगणारं, सुंदर मंदिरांचं, लेण्यांचं, गुहांचं गाव यावेळी दोन ताकदीच्या उमेदवारांमुळे चर्चेत आहे इतकाच काय तो निवडणुकीमुळे झालेला बदल.

कर्नाटक जो कौल देईल तोच ट्रेंड 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दिसेल. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची झाली आहे. त्यामुळे चालुक्याच्या काळातील लेण्यांच्या पाऊलखुणा जशा शेकडो वर्षांनी बदामीत जिवंत आहेत, त्याप्रमाणेच इथला जय-पराजयसुद्धा राजकीय इतिहासात आपल्या खुणा ठळकपणे आधोरेखित करेल.