जहानाबाद (बिहार) : तरुणीची भररस्त्यात छेड काढून तिचे कपडे फाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील जहानाबाद इथं हा संतापजनक प्रकार घडला आहे.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आलं आहे. तर तीन आरोपी फरार आहेत.तरुणीची छेड काढली जात असताना प्रत्यक्षदर्शी मात्र तिची मदत करण्याऐवजी मोबाइलवर व्हिडीओ शूट करण्यात व्यस्त होते.

व्हिडीओत तरुणी सुटका करुन घेण्यासाठी आरोपींसोबत लढा देत असल्याचं दिसतं आहे. आरोप पीडित तरुणीचे कपडे फाडत आहेत. धक्कादायक म्हणजे यावेळी तिथे लोकांची गर्दी असताना कोणीही मदतीला पुढे आलं नाही.

याप्रकरणी सात लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून चार जणांना बिहार पोलिसांनी अटक केली आहे. ज्यात एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे.

याप्रकरणी बिहारचे पोलीस महानिरिक्षक नैयर हसनैन यांनी माहिती देताना सांगितलं की, 'पीडित तरुणी अल्पवयीन आहे. पण तिची ओळख अजून पटलेली नाही. पीडितेने अद्याप पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. चार आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार झाले आहेत. तसेच ज्या मोबाइलमधून व्हिडीओ शूट करण्यात आला तो मोबाइलही जप्त करण्यात आला आहे.'

दरम्यान, या प्रकरणावरुन बिहारमध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे. बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष आरजेडीने बिहार सरकारवर हल्लाबोल केला आहे. आरजेडीचे प्रवक्ते शक्ती यादव म्हणाले की, 'बिहारमध्ये महिलांचं वस्त्रहरण सुरु आहे. महिला आणि मुली आता बिहारमध्ये सुरक्षित नाही. त्यामुळे बिहार सरकार आणि पोलिसांसमोर आता खूप मोठं आव्हान आहे.'