नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचली असल्याचा दावा केला आहे. आपल्या ट्विटमधून मोदींनी मणिपूरमधलं लेईसांग गाव वीज पोहोचलेलं देशातील शेवटचं गाव असल्याची म्हटलं आहे.


मे 2018 मध्ये ज्यावेळी मोदी सरकार सत्तेत आलं त्यावेळी देशातील 18 हजार 452 गावांमध्ये वीज नव्हती. त्यावेळी मोदी सरकारने दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना जाहीर केली होती. याच योजनेअंतर्गत सर्व गावांमध्ये वीज पोहोचल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला आहे.

आता देशातील शेवटचे गावदेखील प्रकाशमान झाले आहे. 28 एप्रिल 2018 हा देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. भाजपप्रणीत एनडीए सरकारनं दिलेलं सर्वात मोठं वचन पूर्ण केलंय. असे मोदी यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.

https://twitter.com/narendramodi/status/990455176581517312

सरकारी आकडेवारीनुसार देशातील 1236 गावं अशी आहेत, जिथे कुणीही राहात नसूनही त्याठिकाणी वीज पोहोचली आहे. तर चराईसाठी आरक्षित असणाऱ्या 35 गावांचाही यात समावेश आहे. मात्र पंतप्रधान मोदींच्या या दाव्यावर आता सर्वच स्तरातून शंका उपस्थित केली जात आहे.

सरकारच्या आकडेवारीनुसार गावातील 10 टक्के घरं, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी वीज पोहोचली असेल तर ते गाव इलेक्ट्रिफाईड झालं असं मानण्यात येतं. मात्र याचा अर्थ असा नाही की संपूर्ण गावात वीज आली. त्यामुळे 100 टक्के गावांमध्ये वीज पोहोचली असली तरीही देशात पूर्णपणे वीजजोडणी झाली असं म्हणता येणार नाही. पंतप्रधान मोदींच्या दाव्यानंतरही देशातील अनेक घरांमध्ये अद्याप वीज पोहोचलेली नाही. त्यामुळेच सरकारने मार्च 2019 पर्यंत चार कोटी ग्रामीण आणि शहरी भागातील कुटुंबांना वीज पुरवण्याची योजना बनवत आहे.

दरम्यान पंतप्रधान मोदींना याचं श्रेय देताना केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयलांनी 'नासा'चे जुने फोटो ट्वीट केले आहेत.

https://twitter.com/PiyushGoyal/status/990480079506608133