कच्छ (गुजरात) : सीमारेषेवरुन घुसखोरी करण्यासाठी शत्रू संधीच्या शोधात असतात. त्यांना रोखण्याचं आव्हान जवानांपुढे असतं. कच्छमध्येही बीएसएफचे जवान प्राणांची बाजी लावून हे काम चोखपणे पार पाडत आहेत. गुजरातमधील कच्छच्या रणावर भारतीय सैनिक कोणत्या परिस्थिती सीमेची सुरक्षा करतात त्याचा हा आढावा -


 


कच्छचे रण... शुष्क... शांत... भयाण... आणि चकवा देणारं... चारी दिशेला... फक्त सन्नाटा..

इथे ना जमीन आहे, ना समुद्र...इथे प्रत्येकवेळ ही दलदल मृत्यू बनून उभी असते. इथे थोडासा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो. इथे केवळ पाकिस्तानच दुष्मन नाही...इथली दलदल आणि परिस्थिती हा सुद्धा मोठा दुष्मन आहे.

जी दलदल कुणालाही क्षणात गिळंकृत करु शकते, त्याच जमिनीवर बीएसएफ जवान पाय रोवून उभे असतात. 512 किलोमीटरच्या या सीमेवर फक्त 262 किलोमीटर अंतरावर तारा आहेत. बाकी भाग... सताड उघडा...



भारत-पाकिस्तान सीमेवरील पिलर नंबर 1175...हा शेवटचा पिलर आहे, यावरुन भारत-पाकिस्तान यांच्यात कोणताही वाद नाही. या पिलरच्या उजव्या बाजूला पाकिस्तान आणि डाव्या बाजूला भारत आहे. भारताकडून बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफचे जवान इथे डोळ्यात तेल घालून उभे असतात. मात्र पाकिस्तानचा ना कोणी सैनिक ना रेंजर इथे बघायलाही मिळत नाही.

दलदलीनं तारा लावण्याचं काम अर्धवट राहिलंय. त्यामुळे बीएसएफला इथं डोळ्यात तेल घालून निगराणी करावी लागते. पण अतिरेक्यांपेक्षा आणखी एक धोका इथल्या जवानांना मोठा असतो.

दलदलामुळे इथे सापांचा वावर अधिक असतो. त्यामुळे जवानांना समोर दुष्मनांशी आणि जमिनीवर सापांशी सामना करावा लागतो.

दलदली जमिनीवर इथं बीएसएफला साथ मिळते... ती टेरेन वेहिकलची... ही रणभूमी असल्यामुळे इथे दुसऱ्या गाड्या काम करु शकत नाहीत, त्यामुळे टेरेन वेहिकल नेहमी सोबतीला असते.

कच्छच्या या रणातल्या वेड्यावाकड्या खाड्याही बीएसएफसाठी आव्हान असतात... कारण मच्छिमारांच्या रुपाआड इथं कुणीही शिरकाव करू शकतो. पण त्यासाठी बीएसएफकडे एक खास टीम आहे.. ज्याचं नाव आहे... क्रीक क्रोकडाईल...

ज्या प्रमाणे मगर पाण्यात आणि जमिनीवर लीलया वावरू शकते... त्याच पद्धतीनं क्रीक क्रोकोडाईल पाण्यात आणि जमिनीवर स्वार होतात.

क्रीक क्रॉकडाईल दलदलीवर राज्य करतात... समुद्राच्या लाटांनाही झेलतात... घुसखोरीची खबर मिळताच... स्पीड बोटीनं तातडीने घटनास्थळी दाखल होतात..

पाकिस्तानने दोनवेळा समुद्रामार्गे भारतावर वार केला आहे. 12 मार्च 1993 आणि 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर हल्ला झाला होता. समुद्रामार्गेच हा हल्ला झाला होता आणि हा मार्ग गुजरातच्या समुद्रातून आल्याचं सांगण्यात येत होतं.

गुजरात पोलीस स्थानिक गावकरी आणि मच्छिमारांमध्ये ताळमेळ ठेवतात. त्यामुळे कोणतीही घुसखोरी तातडीने हाणून पाडता येते.

सरक्रीक, पीर सनाईन क्री, कोरी क्रीक, देवरी क्रीक आणि हरामी नाला,  याच पाच ठिकाणी सर्वाधिक घुसखोरीची प्रकरणं समोर येतात.


खरं तर इथं पाण्याचा खजिना आहे... पण सागळं पाणी खारट आहे... त्यामुळे त्याचा अजिबात उपयोग नाही... पाण्याविना जवानांची आव्हानं आणखी कठीण होतात.

कच्छच्या या रणात नेहमी मॉक ड्रीलही होत असते... कारण कधी कुठून आणि कशी घुसखोरी होईल हे सांगता येत नाही.



दिल्ली मुंबईत राहणारे आपण या शिलेदारांच्या जीवावर निवांत जगू शकतोय... या सैनिकांची ताकद, संयम आणि शौर्य... हे ऐऱ्यागैऱ्याचं काम नाही...



कच्छच्या रणमधून कॅमरामॅन सचिन शिंदेसह जीतेंद्र दीक्षित, एबीपी माझा