नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधील भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवरुन रशियाने भारताला पाठिंबा दिला आहे. प्रत्येक देशाला आपापली सुरक्षा करण्याचा अधिकार आहे, असे रशियाने म्हटलं आहे.
रशियाने अगदी काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला सांगितलं होतं की, दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी 'प्रभावी' पावलं उचलावी.
रशियाचे भारतातील राजदूत अलेक्झेंडर एम कदाकिन यांनी सीमेपलिकडील दहशतवादाविरोधातील लढाईत रशिया भारतासोबत असल्याचं सांगितलं.
"सर्वात मोठं मानवाधिकारांचं उल्लंघन तेव्हा होतं, जेव्हा दहशतवादी भारतातील लष्कराच्या ठिकाणांवर आणि शांतताप्रिय नागरिकांवर हल्ला करतात. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकसारख्या हल्ल्याचं आम्ही स्वागत करतो. प्रत्येक देशाला आपापल्या सुरक्षेचा पूर्ण अधिकार आहे.", असे कदाकिन म्हणाले.
पाकिस्तानसोबतच्या एकत्रित युद्ध सरावामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही, असा विश्वास रशियाने भारताला दिला आहे. कारण रशिया-पाक एकत्रित युद्ध सराव पाकव्याप्त काश्मीरमधील क्षेत्रात झालं नाही.
दहशतवादाच्या कोणत्याही रुपाविरोधात रशिया निर्णायक संघर्षासाठीच्या भूमिकेच्या पाठीशी आहे, असे रशियन परराष्ट्र मंत्रालयाकडून गेल्याच आठवड्यात सांगण्यात आले आहे.
"नियंत्रण रेषेवरुन भारत आणि पाकिस्तानमधील गंभीर स्थितीमुळे रशियाही चिंतेत आहे. आम्ही दोन्ही देशांना आव्हान करतो की, तणाव वाढू न देता चर्चेतून किंवा राजकीय पद्धतीने समस्यांवर तोडगा काढावा. दहशतवादाच्या कोणत्याही रुपाविरोधातच आम्ही उभे आहोत.", असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.