आम्ही तर शांततेनं आंदोलन करतोय, मग आम्हाला का जाऊ दिलं जात नाही. शेतकरी म्हणजे दहशतवादी आहेत का? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थिक केला आहे.
गेल्या दहा दिवसांपासून ही किसान यात्रा सुरु आहे. ती दिल्लीत धडकेपर्यंत सरकार गाफील राहिलं. पण हे वादळ दिल्लीच्या वेशीवर आल्यानंतर मात्र हालचाल सुरु झाली. दहा दिवसानंतर आंदोलनाच्या प्रतिनिधींना पहिल्यांदा चर्चेचं बोलावणं आलं. कृषीमंत्री राधामोहन सिंह तर आजही दिल्लीतून गायबच होते, मग गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर हा तोडगा सोडवण्याची जबाबदारी आली.
ट्रॅक्टरवर आरुढ होऊन दिल्लीकडे निघालेला प्रचंड जनसमुदाय पाहिल्यानंतर अनेकांना महेंद्रसिंह टिकैत यांच्या आंदोलनाची आठवण आली असेल. 30 वर्षांपूर्वी म्हणजे 1989 मध्ये टिकैत यांनी हजारो शेतक-यांसमवेत संसदेवर धडक देऊन दिल्ली हादरवून सोडली होती. शेतकरी आपल्या जनावरांसह दिल्लीत दाखल झाले होते. आज 30 वर्षानंतर त्यांचा मोठा मुलगा आणि भारतीय किसान युनियनचा अध्यक्ष नरेंद्रसिंह टिकैत या आंदोलनाचं नेतृत्व करतोय.
महेंद्रसिंह टिकैतांनी आंदोलनाची हाक दिली की राज्य, केंद्र सरकारांना धडकी भरायची, आज तीच ताकद आपल्याला परत मिळावी अशी शेतकऱ्यांची मनोमन इच्छा आहे. त्यामुळेच जुन्या आंदोलनात सहभागी होणारे अनेक शेतकरी या यात्रेत पुन्हा सामील झालेत.
शेतकऱ्यांच्या मागण्या काय?
- स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार कृषिमालाला भाव मिळावा
- शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करा
- किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज मिळावं
- देशभरातील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करा
- 14 दिवसात ऊसाचा हमीभाव निश्चित करा
- एनसीआर क्षेत्रात दहा वर्ष जुन्या ट्रॅक्टरवरील बंदी मागे घ्यावी
- व्यावसायिक वापरासाठीच्या साखरेला किमान 40 रुपये किलो भाव द्या
जय जवान जय किसानचा नारा देणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती. आजच्याच दिवशी शेतकऱ्याचा आवाज अशा पद्धतीने दडपला जाणं हे दुर्दैव. आजच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. अहिंसेची शिकवण त्यांनी संपूर्ण जगाला दिली. पण शेतकऱ्यांच्या आंदोलनाचाच हक्क हिरावून त्यांच्याच शिकवणीला हरताळ फासण्याचं काम सरकारनं केलं. शेतकऱ्याच्या असंतोषाची ही धग सरकारनं वेळीच ओळखलेली बरी.