अहमदाबाद : गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील गीर अभयारण्यात सिंहांच्या मृत्यूची मालिका सुरुच आहे. गेल्या 18 दिवसात 21 सिंहांचा मृत्यू झाला आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, 12 सप्टेंबरनंतर दलखनिया भागात आपापसातील संघर्षामुळे आणि आजारामुळे सिंहांचा मृत्यू झाला आहे.

या मृत्यूचं कारण एक जीवघेणा व्हायरस असेल, असंही बोललं जात आहे. व्हायरसमुळे 1994 पासून एक हजार सिंहांचा मृत्यू झाला आहे.

गीर अभयारण्यात सिंहांच्या मृत्यूचं मुख्य कारण आपापसातील लढाई आणि यकृत-किडनीचा संसर्ग आहे, अशी माहिती वन विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली. एकमेकांवर हल्ला केल्यामुळे सिंहांना हा संसर्ग होत आहे, ज्यामुळे त्यांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत.

व्हायरसचा धोका लक्षात घेता 31 सिंहांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे. सर्वांची तपासणीही केली असून आवश्यक पाऊलं उचलली जात आहेत, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली. 12 सप्टेंबर रोजी सिंहांच्या मृत्यूची मालिका सुरु झाली. गेल्या दोन वर्षात गीरमध्ये 84 सिंहांचा मृत्यू झाला. मृत्यूचं कारण शोधण्यासाठी केंद्र सरकारने एक समितीही नियुक्त केली आहे.

सिंहांच्या मृत्यूप्रकरणी काही दिवसांपूर्वी गुजरात हायकोर्टात एका कोर्ट मित्राने त्याचा अहवाल सादर केला होता. या रिपोर्टनुसार, गीर अभयारण्याचं क्षेत्र अजून वाढवण्याची गरज आहे. सिंहांच्या एका टोळक्याला 260 चौरस मीटर क्षेत्राची गरज असते. सिंहांच्या अनैसर्गिक मृत्यूचे जे खटले आहेत, ते फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावेत, असंही या अहवालात म्हटलं होतं.