नवी दिल्ली: गांधी जयंती आणि जय जवान जय किसानचा नारा देणारे देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत एल्गार पुकारला. भारतीय किसान युनियनची किसान क्रांती यात्रा दिल्लीत दाखल झाली. मात्र पोलिसांनी त्यांना दिल्लीच्या सीमेवर रोखल्याने, पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री झाली. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी आधी पाण्याचे फवारे मारले, त्यानंतर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

स्वामीनाथन आयोगासह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आज शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली . मात्र दिल्लीच्या सीमेवरच शेतकऱ्यांना रोखण्यात आलं आहे.  दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांबरोबर आरपीएफ, पॅरामिलिटरी फोर्स सुद्धा तैनात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या सीमेजवळ असलेल्या दिल्लीच्या पूर्व भागात पोलिसांनी 144 कलम अर्थात जमावबंदीही लागू केली आहे.

भारतीय किसान युनियन हे आंदोलन करत आहे. ज्याला किसान क्रांती यात्रा असं नाव देण्यात आलं आहे.  उत्तराखंडच्या हरिद्वारमधून या यात्रेला सुरुवात झाली होती. मात्र दिल्लीच्या सीमेवर शेतकरी येताच पोलिसांनी त्यांना रोखलं. इतकंच नाही तर मोठ्या प्रमाणात पाण्याचे फवारे शेतकऱ्यांवर मारण्यात आले. अनेक शेतकरी ट्रॅक्टरही घेऊन आले होते. मात्र पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखलं.

दिल्लीजवळ उत्तर प्रदेशचे सीमेवर हजारो शेतकरी एकत्र झाले. मात्र प्रशासनाने आधीच या भागात जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यातच लखनऊवरुन दोन वरिष्ठ आएएस अधिकारी हेलिकॉप्टरने गाझियाबादला रवाना झाले.

दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आंदोलनासमोर एवढे पोलीस उभे केले आहेत, शेतकरी दहशतवादी आहेत का असा सवाल शेतकरी नेते नरेश टिकेत यांनी विचारला.

आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तसेच मोठ्या प्रमाणावर पाण्याचे फवारे सोडण्यात आले.

30 वर्षांपूर्वी  1989 मध्ये महेंद्रसिंह तिकेत यांनी शेतकऱ्यांचं भव्य आंदोलन करुन दिल्ली हादरून सोडली होती. आज तीस वर्षानंतर त्यांचा मोठा मुलगा आणि भारतीय किसान युनियनचा अध्यक्ष नरेंद्र सिंह तिकेत या आंदोलनाचे नेतृत्व करत आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय?

  • स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार कृषिमालाला भाव मिळावा

  • शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करा

  • किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज मिळावं

  • देशभरातील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करा

  • 14 दिवसात ऊसाचा हमीभाव निश्चित करा

  • एनसीआर क्षेत्रात दहा वर्ष जुन्या ट्रॅक्टरवरील बंदी मागे घ्यावी

  • व्यावसायिक वापरासाठीच्या साखरेला किमान 40 रुपये किलो भाव द्या