Congress Meeting : निवडणुकीच्या रिंगणात सातत्याने अपयश पाहावे लागणाऱ्या काँग्रेसला पुन्हा रुळावर आणण्यासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज दुपारी 12 वाजता बैठक बोलावली. सोनिया गांधी यांच्या घरी सुरू झालेल्या बैठकीला प्रियांका गांधी हजर राहिल्या नाहीत. मात्र, या बैठकीला राहुल गांधी उपस्थित होते. या बैठकीत प्रशांत किशोर हे देखील उपस्थित आहेत. या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे, एके अँटनी, अंबिका सोनी, जयराम रमेश, मुकुल वासनिक, दिग्विजय सिंग आणि अजय माकन हे ज्येष्ठ नेतेही सहभागी झाले आहेत. 


गुजरात विधानसभा आणि 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी


मागील काही निवडणुकांमध्ये अपवाद वगळता काँग्रेसच्या हाती अपयश लागले आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. या बैठकीत कमी होत झालेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आणि पक्षाला मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच या बैठकीत निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांना बोलवण्यात आले आहे. त्यामुळे पक्षात आता मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 


या वर्षाच्या अखेरीस गुजरात राज्याच्या निवडणुका होणार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दमदार कामगिरी करत भाजपला घाम फोडला होता. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आणखी दमदार कामगिरी करण्यासाठी काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून आतापासूनच तयारी सुरू करण्यात येणार आहे. 


प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?


प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास त्यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून प्रशांत किशोर काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. त्यांनी काही सूचनाही केल्या होत्या.  


इतर महत्त्वाच्या बातम्या: