Free Electricity In Punjab : पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या नेतृत्वातील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये 1 जुलै 2022 पासून सर्वांसाठी 300 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत 'आप' ला दणदणीत यश मिळाले होते. आपची सत्ता आल्यास प्रत्येक घराला 300 युनिट वीज मोफत दिली जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीतील आश्वासन पूर्ण करण्याच्यादृष्टीने आता सरकारी अधिकारी कामाला लागले आहेत. अनेकजण ओव्हरटाइमही करत आहेत. पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या आकडेवारीनुसार,  राज्यामध्ये 73.80 लाख घरगुती ग्राहकांपैकी जवळपास 62.25 लाख घरांमध्ये वीजेचा वापर हा 300 युनिटपेक्षा कमी आहे. त्यामुळे जवळपास 62.25 लाख घरांना या घोषणेचा थेट फायदा होणार आहे. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर किमान 5500 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. 





असे असणार अनुदान 


हवामानानुसार वीजेचा वापर कमी-अधिक होत असतो. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या पीएसपीसीएलच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जवळपास 62.25 लाख ही सरासरी ग्राहक संख्या आहे. यामध्ये आम्ही मागील काही महिन्यातील वीज वापराच्या दृष्टीने काही निष्कर्ष काढले आहेत.  त्यानुसार आता जवळपास 84 टक्के लोकांना सरकारच्या घोषणेचा फायदा होणार आहे. 


पंजाब सरकारकडून याआधीच विविध योजनांनुसार घरगुती ग्राहकांसाठी दरवर्षी 3998 कोटींचे अनुदान दिले जाते. यामध्ये एससी/बीसी/बीपीएल ग्राहकांना याआधीपासूनच 200 युनिट वीज दर महिन्याला दिली जात आहे. यामध्ये 7 किलोवॅटचा वीज भार असणाऱ्या ग्राहकांना विविध स्लॅबसाठी 3 रुपये प्रति युनिट वीज दिली जात आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: