Hanuman Jayanti 2022 : आज हनुमान जयंती असून ती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी गुजरातमधील मोरबी येथे भगवान हनुमानाच्या 108 फूट मूर्तीचे अनावरण केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. पवनपुत्राचे आशीर्वाद सर्वांवर असोत, असे पंतप्रधान म्हणाले.


देशभरात भगवान हनुमानाचे चार धाम प्रकल्प


पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, हनुमानजी यांचे चार धाम प्रकल्पांतर्गत देशभरात चार दिशांना बसवण्यात येणाऱ्या चार मूर्तींपैकी ही दुसरी मूर्ती आहे. मोरबी येथील बापू केशवानंद यांच्या आश्रमात याची स्थापना करण्यात आली आहे. देशाच्या पश्चिमेला स्थापित केलेला हा पुतळा आहे. या मालिकेतील पहिला पुतळा 2010 मध्ये शिमल्यात बसवण्यात आला होता. मोरबीमध्ये 2018 मध्ये भव्य मूर्तीच्या उभारणीला सुरुवात झाली होती. त्याची किंमत 10 कोटी रुपये आहे. पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला हजेरी लावली. त्याचवेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि अन्य नेते कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.


 




दोन्ही धर्माच्या लोकांमध्ये तणाव, सर्वत्र परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान


याआधी देशातील विविध राज्यांमध्ये हिंदू आणि मुस्लिमांमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अलीकडच्या काळात देशात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तणावाचे वातावरण आहे. आधी मुंबईत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केली, त्यानंतर कर्नाटकात मंदिरांभोवतीचे मुस्लिम दुकानदार हटवण्याची आणि मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याची प्रकरणे समोर आली. त्यामुळे दोन्ही धर्माच्या लोकांमध्ये तणाव निर्माण झाला होता. तणावाच्या परिस्थितीत दोन्ही समाजाचे लोक अनेकवेळा समोरासमोर आले. मग ते राजस्थानमधील करौली असो, बंगलोर असो किंवा मध्य प्रदेशातील खरगोन असो. सर्वत्र परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.


 


हे वादाचे सर्वात मोठे कारण 


महाराष्ट्रात लाऊडस्पीकरवरून सुरू झालेला हा वाद हळूहळू देशभर गाजत आहे. हनुमान जयंती 2022 ला अजानच्या विरोधात, लाऊडस्पीकरवरून हनुमान चालीस पठण केले जात आहे. महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी सरकारला 3 मे पर्यंत मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम दिल्याने हा वाद सुरू झाला. यानंतर देशभरात यावरून वाद सुरू आहे. अलीगढमध्ये लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचे पठणही सुरू करण्यात आले आहे.