नवी दिल्ली : मुलाला आपल्या पालकांच्या घरात राहण्याचा कायदेशीर अधिकार नसल्याचं दिल्ली हायकोर्टाने ठणकावून सांगितलं आहे. केवळ दयेमुळेच मुलं आई-वडिलांची मालकी असलेल्या घरात राहू शकतात, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

मुलाचं लग्न झालेलं असो वा नसो, पालकांनी विकत घेतलेल्या घरात राहण्याचा कायदेशीर अधिकार मुलाला नाही. जोपर्यंत पालक आणि मुलाचे संबंध सलोख्याचे आहेत, तोपर्यंत ते एका घरात राहतात.

याचा अर्थ आयुष्यभर हे ओझं पालकांनी सहन केलंच पाहिजे, असा होत नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. दिल्लीतील एका व्यक्तीने आपली दोन्ही मुलं आणि सुनांना स्वतःची मालकी असलेलं घर रिकामं करण्यास सांगितलं होतं. याविरोधात एका मुलाने हायकोर्टात अपिल केलं. मात्र मुलाची मागणी फेटाळून लावताना कोर्टाने त्यालाच धारेवर धरलं.

संबंधित पालकांनी मुलं आणि सुनांमुळे आपलं आयुष्य नरकासमान झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवली होती. त्यानंतर 2007 आणि 2012 मध्ये त्यांनी मुलांना घरात प्रवेशापासून मज्जाव करण्याबाबत नोटीसही बजावली होती.