मुंबई : केंद्र सरकारने सर्व देशाला कॅशलेस बनवण्याचा निर्धार केला आहे. देशात कॅशलेस व्यवहाराचं प्रमाण वाढावं यासाठी बँकांना नवी 10 लाख कार्ड स्वाईप मशिन्स विकत घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.


देशातली सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक त्यातील तब्बल सहा लाख मशिन खरेदी करणार आहे. तर एसबीआय पाठोपाठ खाजगी क्षेत्रातली एक बलाढ्य बँक असलेल्या आयसीआयसीआयने तब्बल 100 गावं कॅशलेस बनवण्याचा विडा उचलला आहे.

दररोज एक गाव कॅशलेस होणार

आयसीआयसीआय बँक देशातली तब्बल शंभर गावं कॅशलेस बनवणार आहे. तेही फक्त 100 दिवसात, म्हणजेच आगामी तीन महिन्यात आयसीआयसीआय बँक दररोज एक या प्रमाणे 100 गावे कॅशलेस करणार आहे.

आयसीआयसीआय त्यासाठी सध्या ग्रामीण भागात सर्वाधिक वापरात असलेल्या बेसिक फोनच्या माध्यमातून वापरता येईल अशी अॅप्लिकेशन विकसित करत आहे. अशा बेसिक फोनमार्फत एसएमएस बँकिंगच्या साहाय्याने कॅशलेस व्यवहार पूर्ण करता येतील, अशी माहिती आयसीआयसीआय बँकेच्या एमडी आणि सीईओ चंदा कोचर यांनी दिली.

दत्तक गावांचं कॅशलेस व्यवहारांसाठी खातं

या कॅशलेस मोहीमेची सुरूवात म्हणून बँक दत्तक घेणार असलेल्या गावांमधील सर्वांचं बँक खातं उघडणार असून हे खातं फक्त कॅशलेस व्यवहारांसाठीच वापरता येणार आहे. बेसिक फोनमधील एसएमएसवर आधारीत कॅशलेस व्यवहारांसाठी आवश्यक ट्रेनिंगही बँक त्या त्या गावातील गावकऱ्यांना देणार आहे.

कॅशलेस व्यवहारासाठी बँकेचा पायलट प्रोजेक्ट असलेल्या गुजरातमधील अकोदरा गावातील अनुभवांवरून नव्या 100 गावांसाठी मार्गदर्शक सूचना बनवण्यात येणार आहेत.

आयसीआयसीआय बँकेने साबरकांठा जिल्ह्यातील अकोदरा हे गाव डिजीटल व्हिलेज म्हणून दत्तक घेतलं आहे, या गावातच सर्वात आधी ते कॅशलेस गावाची संकल्पना वापरणार आहेत.

कॅशलेस बँकिंगसाठी बँक नव्याने दत्तक घेणार असलेली शंभर गावे नेमकी कोणती, हे मात्र जाहीर करण्यात आलेलं नाही.

या प्रकल्पासाठी आयसीआयसीआय बँक टॅबलेट आधारीत अकाऊंट ओपनिंग आणि आधार केवायसी यांचा वापर करणार आहे. यामुळे कमीत कमी खर्चात तसंच वेळेत आणि कागदपत्रांशिवाय बचत खातं उघडता येईल. या सर्व खातेधारकांना रूपे डेबिट कार्ड देण्यात येणार आहे.

जिथे आवश्यकता असेल तिथे पीओएस म्हणजे कार्ड स्वाईप मशिन्स बसवण्यात येतील आणि जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहित केलं जाईल, असं आयसीआयसीआय बँकेने म्हटलंय.

संबंधित बातमी : येत्या तीन महिन्यात 10 लाख स्वाईप मशिन बाजारात येणार