मुंबई : सरकारने 1 जुलैपासून देशात जीएसटी लागू करण्याची जोरदार तयारी केली असली तरी नवी कर प्रणाली लागू झाल्याने सुरुवातीला काही वस्तूंचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. डीलर्स सध्या स्टॉक संपवण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे नवीन कर प्रणाली लागू झाल्यानंतर काही वस्तूंचा तुटवडा जाणवू शकतो, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

जीएसटीनंतर कर प्रणाली कशी असेल, याबाबत व्यापाऱ्यांमध्येच अजून संभ्रम आहे. जीएसटीनंतर कर प्रणाली ही संगणकीकृत असेल, असं सरकारने अगोदरच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये विशेषतः अडचणी जाणवण्याची शक्यता आहे.

औषधांचा तुटवडा जाणवणार?

देशभरातील औषध विक्रेते सध्या स्टॉक संपवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे नवीन औषधांची ऑर्डर दिल्या जात नाहीयेत. दुसरीकडे औषध निर्मात्या कंपन्यांकडून औषधांवर भरघोस सूट दिली जात आहे. पण औषधविक्रेते स्टॉक खरेदी करत नसल्याने सुरुवातीला औषधांचा तुटवडा जाणवू शकतो.

जीएसटी लागू झाल्यानंतर औषधांवर कमी कर असेल. त्यामुळे आत्ताच स्टॉक खरेदी करुन ठेवल्यास त्याचा तोटा होईल, असं औषधविक्रेत्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान अर्थव्यवस्थेतील हा सर्वात मोठा बदल असल्याने परिस्थिती सामान्य होण्यासाठी सुरुवातीचे काही आठवडे वेळ लागू शकतो, असं सरकारनेही सांगितलं आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा जाणवू शकतो. सध्याच्या तुलनेत जीएसटीनंतर 81 टक्के जीवनावश्यक वस्तू स्वस्त होतील, असा दावा सरकारने केला आहे. त्यामुळे सध्याच्या किंमतीतील वस्तूंची ऑर्डर देणं व्यापारी टाळत आहेत.

संबंधित बातम्या :

GST : 1 जुलैला सकाळी उठल्यानंतर तुमच्या-आमच्या जीवनावर काय परिणाम?


जीएसटीनंतर या वस्तू स्वस्त, तुमचे पैसे कुठे वाचणार?


जीएसटी लागू झाल्यानंतर या वस्तू महागणार!