लखनौ : संपूर्ण भारतातील सर्वात जास्त सैनिक असणाऱ्या गावात नरेंद्र मोदींच्या राष्ट्रवादाची हवा चाललेली नाही. सैनिकांच्या नावाने मतं मागणाऱ्या मोदींच्या भारतीय जनता पक्षाचा सैनिकांच्या गावात पराभव झाला आहे. देशाला सर्वात जास्त सैनिक देणाऱ्या गाजीपूरमधील गहमर या गावात 10 हजाराहून अधिक सैनिक आहेत. याच गाजीपूरमधील जनतेने भाजपला साफ नाकारले आहे.


गाजीपूर लोकसभा मतदारसंघातील गहमर या गावची लोकसंख्या 1.50 लाख इतकी आहे. या गावात 10 हजारांहून अधिक तरुण देशसेवा करत आहेत. या गावात प्रत्येक घरातील एक तरुण सैन्यात आहे, तर असंख्य घरांमध्ये निवृत्त सैनिक आहेत.

गाजीपूरमध्ये बहुजन समाज पार्टीच्या अफजाल अन्सारी यांनी भाजपच्या केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांचा पराभव केला आहे. सैनिकांच्या नावावर मतं मागून मोदींच्या भाजपने देशात बहुमत मिळवलं आहे. परंतु सैनिकांच्या कुटुंबीयांनी आणि निवृत्त सैनिकांनी भाजपला नाकारले आहे.

याबाबत केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह ट्विटरवर म्हणाले की, "आम्हाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. परंतु गाजीपूरमध्ये मनोज सिन्हांच्या पराभवामुळे खूप रिकामं वाटतंय. त्यांचा पराभव जिव्हारी लागला आहे."

मनोज सिन्हा यांना निवडणुकीत 4 लाख 46 हजार 690 मितं मिळाली आहेत. तर अफजाल अन्सारी यांना 5 लाख 66 हजार 82 मतं मिळाली आहेत.

14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशवाद्यांच्या अड्ड्यावर एअर स्ट्राईक करुन दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. याचे देशपातळीवर मोठ्या प्रमाणात राजकारण करण्यात आले. अनेक सभांमध्ये मोदींनी सैनिकांच्या, शहीद सैनिकांच्या नावाने मतं मागितली. नागरिकांनी भाजपला भरभरुन मतदान केले. परिणामी भाजपला बहुमत मिळाले. परंतु गाजीपूरमधील सैनिकांच्या कुटुबीयांनी मात्र भाजपला साफ नाकारल्याचे पाहायला मिळत आहे.