नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर आज (25 मे) भाजपसह सर्व घटक पक्षांनी नरेंद्र मोदींची संसदीय पक्षनेतेपदी निवड केली आहे. केंद्रीय सभागृहातील बैठकीदरम्यान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर भाजपचे दोन माजी अध्यक्ष राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी या प्रस्तावावर मोहर उमटवली. मोदी आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. आपले 'सरकार पार्ट 2' कसे चालवायचे याबाबत मोदींनी एनडीएच्या 353 खासदारांना मार्गदर्शन केले. मोदींनी जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी खासदारांना पाच महत्त्वाचे सल्ले दिले.


पहिला सल्ला : छपास और दिखास से बचके रहना
मोदी म्हणाले की, लालकृष्ण अडवाणींनी आम्हाला शिकवलं आहे की, 'छपास और दिखास इन दो चीजो से बचके रहना चाहीए', याचा अर्थ छापण्याची आणि दिसण्याची लालच कमी करावी लागेल. (पैसे कमावण्यासाठी भ्रष्टाचार करु नये, सतत माध्यमांवर दिसण्यासाठी प्रयत्न करु नये)

दुसरा सल्ला : माध्यमांच्या माईकसमोर काहीही बरळू नका
मोदी म्हणाले की, "2014 ते 2019 या पाच वर्षांच्या कार्यकाळात आपण कोणत्याही चुकीमुळे चर्चेत राहिलो नाही. परंतु काही नेत्यांनी माध्यमांना मसाला पुरवला. त्यामुळे खूप चर्चा झाली. टीव्हीवाल्यांच्या माईकमध्ये इतकी ताकद असते की, काही लोक तो माईक दिसला की काहीही (मानहानी होईल असे काहीही)बरळतात. त्यामुळे कुठेही काहीही बरळण्यापासून स्वतःला रोखा."

तिसरा सल्ला : स्वतःला व्हीआयपी समजू नका
मोदी म्हणाले की, "देशवासी व्हिआयपी कल्चरचा तिरस्कार करतात. खासदार झाल्यामुळे तुमच्या मनात तुम्ही व्हीआयपी असल्याची भावना निर्माण होईल. एखाद्या ठिकाणी तुमची चेकींग (तपासणी) केली तर तुम्ही त्याला नकार देऊ शकता किंवा मी रांगेत का उभा राहू अशी भावनादेखील तुमच्या मनात येईल. परंतु तुम्हीदेखील देशाचे नागरिक आहात. तुम्हीदेखील इतर नागरिकांप्रमाणे वागायला हवे. नियमांचे पालन करायला हवे."


चौथा सल्ला : जगाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करा
मोदींनी सांगितले की, "निवडणूक जिंकल्यानंतर मी जगभरातल्या अनेक नेत्यांशी बोललो आहे. त्यांच्याशी बोलल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली आहे की, जगाला भारताकडून खूप अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांना आपण नक्कीच पूर्ण करु. त्यासाठी खूप मेहनत करा. भारतमातेपेक्षा आपली दुसरी कोणतीही इष्टदेवता नाही."

पाचवा सल्ला : चांगली संगत करा
पाचवा सल्ला देताना मोदी म्हणाले की, "तुम्ही आता खासदार झालेले आहात, तुम्ही दिल्लीत याल. इथे कोणतीही श्रीमंत व्यक्ती तुमची मदत करु पाहील, परंतु तुम्ही त्यावर भाळू नका. लोकांकडून अशी सेवा करुन घेण्याच्या नादात सामान्य जनतेचा तुमच्यावरचा विश्वास उडेल. जुने खासदार तुम्हाला येऊन म्हणतील की, अमुक एक व्यक्ती खूप चांगली आहे. मी खासदार असताना ती माझी कामं करत होती, तुमची कामंदेखील करेल. परंतु अशा लोकांपासून दूर रहा.

व्हिडीओ पाहा