Who's Sunita Vishwanath: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी बुधवारी भाजपच्या मुख्यालयामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधत त्यांना सुनिता विश्वनाथ यांच्याविषयी विचारले आहे. यावेळी स्मृती इराणी यांनी सुनिता विश्वनाथ यांच्या संबंधी अनेक प्रश्नांची विचारणा केली. सुनिता विश्वनाथ या कोण आहेत आणि राहुल गांधी यांनी त्यांची भेट का घेतली? भारतातील सरकार पाडण्याचं षडयंत्र रचणाऱ्या जॉर्ज सोरस यांच्याशी त्यांचा संबंध काय? या आणि अशा अनेक प्रश्नाची सरबती केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली.
कोण आहेत सुनिता विश्वनाथ?
सुनिता विश्वनाथ या अमेरिकेतील हिंदू फॉर ह्युमन राईट्स या संस्थेच्या सह - संस्थापक आहेत. परंतु या संस्थेला अमेरिकेतील इतर हिंदू समाजाचा बराच विरोध आहे. याशिवाय सुनिता विश्वनाथ या अफगाण महिला फॉरवर्ड नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्याही संस्थापक आहेत. जेव्हा त्यांना 2020 साली कोलंबियाच्या विश्वविद्यालयामध्ये धार्मिक जीवन सल्लागार बनवण्यात आले. तेव्हा मात्र त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या.
सुनिता विश्वनाथ यांचे दोन विवाह झाले आहेत. त्यांचे पहिले पती सुकेतू मेहता हे सध्या न्यूयॉर्कच्या विश्वविद्यालयामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. परंतु काही कारणास्तव त्यांचे हे लग्न टिकू शकले नाही. तर त्यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ ही स्टीफन शॉ यांच्याशी बांधली. स्टीफन शॉ हे सध्या ज्यू व्हॉईस फॉर पीस या संस्थेचे सक्रिय सदस्य आहेत. ही संघटना पॅलेस्टाईनच्या हक्कांसाठी काम करत असल्याचं म्हटलं जातं. तसेच ही संघटना बहिष्कार आणि इस्रायलविरुद्ध आर्थिक निर्बंधांच्या समर्थनार्थ देखील आवाज उठवते.
वृत्तानुसार, जॉर्ज सोरस यांच्यावर भारतीय लोकशाही विरोधात षडयंत्र रचल्याचे आरोप आहेत. त्यांच्याशी सुनिता विश्वनाथ यांचे चांगले संबंध आहेत. तसचे त्या जॉर्ज यांच्या संस्थेला आर्थिक मदत करत असल्याचं देखील म्हटलं जात.
राहुल गांधी हे अमेरिका दौऱ्यावर असताना सुनिता विश्वनाथ यांना का भेटले असा सवाल करत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. तर 'ज्यांचे भारताच्या लोकशाहीविषयी चांगले मत नाही अशा लोकांसोबत राहुल गांधी का बसले आहेत हे काँग्रेस पक्षाला सांगायला आवडेल का?' असा प्रश्न देखील स्मृती इराणी यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे आता स्मृती इराणी यांच्या या टीकेवर काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.