Delhi Metro: दिल्ली मेट्रो प्रशासनाने (Delhi Metro) आज प्रवाशांसाठी आज नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. या नवीन सूचनांनुसार दिल्ली मेट्रोतून प्रवाशांना मद्याच्या 2 सीलबंद बाटल्या घेऊन प्रवास करण्याची मुभा आहे. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दिल्ली मेट्रो आता प्रवाशांना दारूच्या दोन सीलबंद बाटल्या घेऊन जाण्याची परवानगी (Carry 2 Sealed Bottles Of Alcohol) देण्यात आली आहे. परंतु मेट्रो रेल्वे स्थानकाच्या आवारात मद्यपान करण्यास मनाई करण्यात आली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) च्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दिल्ली मेट्रोवर पूर्वी विमानतळ एक्सप्रेस लाईन वगळता मद्य वाहतूक करण्यास मनाई होती. आता, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि DMRC च्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीने नुकतेच नियमांचे पुनरावलोकन केले होते. त्यानंतर नवीन सूचना जारी करण्यात आल्यात.
प्रवाशांना मद्याच्या सीलबंद बाटल्यांसह प्रवास करण्याची मुभा असली तरी मेट्रोच्या परिसरात दारू पिण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मेट्रो प्रवाशांनी प्रवास करताना नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केले. दिल्ली मेट्रोत जर, कोणताही प्रवासी मद्य सेवन करताना, अथवा मद्य सेवनामुळे असभ्य वर्तन करताना आढळल्यास, कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचेही दिल्ली मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी म्हटले.
मुंबई मेट्रोचा नियम काय?
दिल्लीतील मेट्रोमधून मद्याच्या दोन सीलबंद बाटल्यांसह प्रवास करण्यीच मुभा प्रवाशांना आहे. मुंबई मेट्रोतून (Mumbai Mertro) ही असा प्रवास करता येऊ शकतो, असे 'मुंबई मेट्रो वन'च्या (Mumbai Metro One) सूत्रांनी सांगितले. दिल्ली मेट्रो प्रमाणेच मुंबई मेट्रोतून ही प्रवाशांना मद्याच्या सीलबंद बाटल्यांसह प्रवास करता येऊ शकतो. या सीलबंद मद्याच्या बाटल्या प्रवाशांनी स्वत:कडे बाळगणे आवश्यक आहे. मुंबई मेट्रोतून मद्याच्या दोन पेक्षा अधिक सीलबंद बाटल्यांसह प्रवास करता येऊ शकतो. दिल्ली मेट्रोप्रमाणेच मुंबई मेट्रो आणि स्टेशन परिसरातही प्रवाशाने मद्य प्राशन केल्यास त्याला कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याचे मुंबई मेट्रो वनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.