मुंबई: या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी केंद्र सरकारने अल्प बचत योजनांमध्ये (Small Saving Scheme) गुंतवणूक करणाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने अल्प बचत योजनांचे व्याजदर वाढवले आहेत. नवीन व्याजदर 1 एप्रिल 2023 पासून लागू होतील. या योजनांचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार असून ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजनेवरील व्याजदर 8 टक्क्यांवरुन 8.2 टक्के करण्यात आले आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे PPF वरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकास पत्र यासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ (एप्रिल ते जून या तिमाहीसाठी)
- ज्येष्ठ नागरिक बचत योजना - 8.2 टक्के
- किसान विकास पत्र - 7.5 टक्के
- एक वर्ष मुदत ठेव - 6.8 टक्के
- दोन वर्षे मुदत ठेव - 6.9 टक्के
- तीन वर्षे मदत ठेव - 7 टक्के
- पाच वर्षे मुदत ठेव - 7.5 टक्के
- मासिक प्राप्ति योजना - 7.4 टक्के
- राष्ट्रीय बचत योजना (NSC) - 7.7 टक्के
- सुकन्या समृद्धी योजना - 8 टक्के
- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)- 7.1 टक्के (कोणताही बदल नाही)
पीपीएफवरील (PPF) व्याजदरात कोणताही बदल नाही
केंद्र सरकारने सेवानिवृत्ती नियोजनातून जमा केलेल्या पीपीएफ (Public Provident Fund) योजनेच्या व्याजदरात पुन्हा एकदा कोणताही बदल केलेला नाही. PPF व्याजदर सलग 12 व्या तिमाहीत बदललेले नाहीत. सध्या या योजनेअंतर्गत सरकार गुंतवणूकदारांना 7.1 टक्के व्याज देत आहे.
Small Saving Scheme: अल्प बचत योजनांचा व्याजदर कसा ठरवला जातो?
सरकार दर तिमाहीत अल्प बचत योजनांवरील व्याजदरात सुधारणा करते. व्याजदर काय असतील, या योजनांच्या समान परिपक्वता असलेल्या सरकारी रोख्यांवर सरकारला किती नफा झाला यावर त्याचा नवा व्याजदर अवलंबून असतो. श्यामला गोपीनाथ समितीने सरकारला अल्प बचतींवरील व्याजदर हे बॉण्ड उत्पन्नापेक्षा 25 ते 100 bps जास्त असावे अशी शिफारस केली होती. यापूर्वी डिसेंबरच्या तिमाहीत सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली होती. मात्र त्यावेळी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात वाढ करण्यात आली नव्हती.