नवी दिल्ली : डास मारणाऱ्या कॉईलमुळे दिल्लीमध्ये सहा लोकांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डास मारायच्या कॉईलमुळे गादीला आग लागली आणि त्यानंतर झालेल्या धुरामुळे सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 9 वाजता बुलंद मशिदीच्या परिसरात एका घराला आग लागल्याची माहिती मिळाली आणि नंतर त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. 


दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, डास मारण्याच्या कॉईलमुळे आग लागली आणि त्यामुळे झालेल्या धुरात गुदमरून सहा लोकांचा मृत्यू झाला. या घरात एकूण नऊ लोक होते. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दल पोहोचलं आणि नंतर ती आग विझवण्यात आली. त्यानंतर यात अडकलेल्या सर्वजणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी सहा जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. उर्वरित तीन लोकांची तब्येत धोक्याच्या बाहेर आहे. 


पहाटेच्या सुमारास आग लागल्याची शक्यता 


ज्या ठिकाणी ही आग लागली त्याच्या शेजारच्यांनी सांगितलं की, पहाटेपर्यंत तसं काही जाणवलं नाही, पण सकाळी सातच्या सुमारास त्या घरातून धूर निघू लागल्याचं दिसत होतं. त्यानंतर पोलिसांना फोन केला, अग्निशनम दलालाही कळवण्यात आलं. आजूबाजूच्या लोकांचं म्हणणं आहे की या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर जीन्सचा कारखाना आहे. तसेच या घरामध्ये अनेक लोक राहतात, सोबत भाडेकरुही राहतात. या प्रकरणाचा तपास केला जात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. 


चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू


या आगीच्या दुर्घटनेत एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. या मुलाची आई यास्मिन यांनी सांगितलं की, पहाटेच्या वेळी अचानक झालेल्या धुरामुळे गोंधळ निर्माण झाला. या धुरामुळे एका मुलाचा मृत्यू झाला आणि एक मुलगी गंभीर आहे. 


साकीनाका दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू


मुंबईतील अंधेरी परिसरात साकीनाका इथे 27 मार्च रोजी दुकानाला लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही हार्डवेअर दुकानातील कामगार होते. राकेश गुप्ता (वय 22 वर्ष )आणि गणेश देवासी अशी मृतांची नावं आहेत. आग लागली तेव्हा दुकानात अकरा कामगार झोपले होते. त्यापैकी नऊ कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले तर दोघे अडकले होते. यात या दोघांचा होरपळून मृत्यू झाला. 


आधी आग विझली, पुन्हा भडकली


साकीनाका भागात 27 मार्च रोजी पहाटे दोनच्या सुमारास हार्डवेअरच्या दुकानाला आग लागली. या आगीत हार्डवेअरचं आणि त्याच्या शेजारचं दुकान जळून खाक झालं. ही दुकानं साकीनाका मेट्रो स्टेशनच्या जवळच होती. राज श्री असं या दुकानाचं नाव आहे. ही आग एवढी भीषण होती की दूरपर्यंत आगीचे लोळ दिसत होते. आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी अथक प्रयत्न करुन साडेतीनच्या सुमारास आग नियंत्रणात आणली. त्यानंतर पाच वाजता पुन्हा आगीचा भडका उडाला. या आगीत दोन दुकानं जळून खाक झाली. यानंतर पुन्हा काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.