नवी दिल्ली : केंद्र सरकारने तीन राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती केली आहे, तर चार राज्यांतील राज्यपालांमध्ये बदल केले आहेत. सिक्कीमचे राज्यपाल म्हणून श्रीनिवास पाटील यांचा कार्यकाळही संपत आहे. श्रीनिवास पाटील यांच्या जागी गंगाप्रसाद यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नेमणूक झाली आहे. त्यामुळे मराठी माणसाचं ईशान्य भारतातील हक्काचं ठिकाण हरपलं आहे.


सिक्कीममध्ये गेलेल्या प्रत्येक मराठी माणसानं राजभवनात श्रीनिवास पाटलांचा मराठमोळा, जिव्हाळ्याचा पाहुणचार अनुभवला आहे. जुलै 2013 मध्ये श्रीनिवास पाटील यांची सिक्कीमचे राज्यपालपदी नियुक्ती झाली. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर काँग्रेसच्या काळात नेमले गेलेले अनेक राज्यपाल हटवले गेले, मात्र श्रीनिवास पाटील राज्यपालपदी कायम राहिले. नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या संबंधांमुळे हे शक्य झाल्याचं बोललं जात आहे.


माजी सनदी अधिकारी ते राजकीय नेते असा श्रीनिवास पाटील यांचा राजकीय प्रवास आहे. श्रीनिवास पाटील हे लोकसभेचे खासदार राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कराडमधून लोकसभा निवडणूक लढताना त्यांनी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला होता.


श्रीनिवास पाटील यांच्यासोबत काश्मीरचे राज्यपाल एन एन वोरा यांचाही कार्यकाळ संपत आहे. एन एन वोरा 2008 सालापासून जम्मू-काश्मीरचं राज्यपालपद सांभाळत आहेत. वोरा यांच्या जागी बिहारचे सध्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची काश्मीरचे नवे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.


भाजपचे वरिष्ठ नेते लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बिहारचे माजी मंत्री सत्यदेव नारायण आर्य यांची हरयाणाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर हरयाणाचे सध्याचे राज्यपाल कॅप्टन सिंह सोलंकी यांची त्रिपुराच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बेबी राणी मौर्या यांना उत्तराखंडच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे. तथागत रॉय यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून तर गंगाप्रसाद यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.