Siddique Kappan: युएपीए कायद्यानुसार उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केलेले केरळचे पत्रकार सिद्दीकी कप्पन (Siddique Kappan Bail) यांना सुप्रीम कोर्टाने जामीन (Supreme Court) मंजूर केला आहे. सिद्दीकी कप्पन हे हाथरस (Hathras Case) येथील बलात्कार-हत्येच्या घटनेच्या वार्तांकनासाठी उत्तर प्रदेशमध्ये गेले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. जवळपास 23 महिन्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका होण्याची वाट मोकळी झाली आहे. 


सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या खंडपीठासमोर आज कप्पन यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने जामीन देण्यावर सहमती दर्शवली. जामिनाच्या अटी काय असू शकतात, याबाबत उत्तर प्रदेश सरकारने आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. 


हाथरस येथील घटनेनंतर नागरिकांना भडकवण्यासह इतर आरोपांखाली कप्पन सिद्दीकीला अटक करण्यात आली होती. मागील काही महिन्यांपासून सिद्दीकींकडून जामिनासाठी प्रयत्न सुरू होते. हायकोर्टातून जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर कप्पन यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आज जामीन अर्जावर सुनावणी झाली. 


यावेळी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी कप्पन यांच्याकडे कोणती स्फोटके आढळली  असा प्रश्न केला. त्याशिवाय, कप्पन हे कट आखत आहेत, हे सिद्ध करणारे कोणते साहित्य आढळले अशी विचारणा उत्तर प्रदेश सरकारकडे केली. हे प्रकरण आरोप निश्चितीपर्यंतदेखील पोहचले नसल्याचे दिसत असल्याची टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली. 


उत्तर प्रदेश सरकारच्यावतीने महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली. त्यांनी म्हटले की, कप्पन यांच्याकडे कोणतेही स्फोटक आढळले नाही. मात्र, त्यांच्या कारमध्ये आक्षेपार्ह साहित्य आढळले. त्यानुसार आरोपी हा PFI या संघटेनेशी संबंधित असल्याचे समोर आले. यावर सरन्यायाधीशांनी त्या साहित्यात धोकादायक काय होतं असा सवाल केला. 


यावर कप्पन यांची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांनी हाथरस पीडितेला न्याय मिळाला पाहिजे असे लिहिले असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. कप्पन हे ऑक्टोबर 2020 पासून तुरुंगात असल्याचेही सिब्बल यांनी म्हटले. 


प्रकरण काय?


उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्हातील एका गावात 14 सप्टेंबर 2020 रोजी 19 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. घटनेनंतर पीडितेला अलीगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तिची प्रकृती खालावल्यानंतर तिला उपचारासाठी दिल्लीत आणले होते. मात्र, तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या युवतीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर येताच देशभरात संतापाची लाट उसळली होती. पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तिच्या मृतदेहावर कुटुंबावर दबाव टाकून बळजबरीने अंत्यसंस्कार केल्याचा आरोप झाला. पीडितेच्या घरी जाणारे मार्ग पोलिसांनी अडवले होते. 


या घटनेच्या वृत्तांकनासाठी देशभरातील पत्रकार हाथरसमध्ये दाखल होऊ लागले होते. त्यात सिद्दीकी कप्पन यांचाही समावेश होता. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक करत UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.