SBI News: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला (State Bank Of India) दोन वर्षांपूर्वी केलेली एक चूक महागात पडली आहे. या चुकीबद्दल स्टेट बँकेला आता ग्राहकाला नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. एसबीआयच्या कर्मचाऱ्याला चेकवरील क्रमांक व्यवस्थित वाचता आला नाही. त्यामुळे त्याने चेक पुन्हा पाठवला. त्यानंतर संबंधित ग्राहकांने ग्राहक तक्रार निवारण मंचासमोर (Consumer Forum) दाद मागितली.
बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकमधील हुबळी शहरातील हे प्रकरण आहे. हुबळीतील एका महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक वादिराजाचार्य इनामदार यांनी वीज बिल भरण्यासाठी एक चेक दिला होता. एसबीआय बँकेचा हा चेक सहा हजार रुपयांचा होता. हुबळी इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी लिमिटेडच्या (HESCOM )नावाने हा चेक 3 सप्टेंबर 2020 रोजी काढण्यात आला होता. HESCOM चे बँक खाते कॅनरा बँकेत आहे. त्यामुळे हा चेक वटवण्यासाठी एसबीआयच्या शाखेत पाठवण्यात आला होता. त्यानंतर हे सगळे प्रकरण सुरू झाले.
कॅनरा बँकेने हा सहा हजार रुपयांचा चेक वटवण्यासाठी उत्तर कन्नड जिल्ह्यातील हलियाल येथील एसबीआयच्या शाखेत पाठवण्यात आला होता. या चेकवर भरलेली माहिती कन्नड भाषेत नमूद केलेली होती. चेकवरील आकडे कन्नड भाषेत होते. एसबीआय शाखेतील कर्मचाऱ्याने कन्नडमधील 9 अंकाला 6 समजले. हा अंक चेकवरील तारखेच्या महिन्याच्या कॉलमध्ये नमूद होता. त्यामुळे हा चेक जून महिन्यातील आहे, असा समज एसबीआय बँकेतील कर्मचाऱ्याचा झाला. त्यामुळे तीन महिने उलटून गेल्याने या कर्मचाऱ्याने हा चेक पुन्हा माघारी पाठवला. त्यामुळे वीज बिल न भरले गेल्याने इनामदार यांना मनस्ताप सहन करावा लागला.
चेक पुन्हा पाठवल्याने प्राध्यापक इनामदार यांनी आपली ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या तक्रारीवर दोन वर्षानंतर निकाल जाहीर करण्यात आला. एसबीआयने या प्रकरणाला गांभीर्याने घेत एसबीआयला 85 हजार 177 रुपयांचा दंड ठोठावला. बँकेने ग्राहकाला नुकसान भरपाई आणि दंड म्हणून ही रक्कम द्यावी असे ग्राहक तक्रार निवारण मंचाने आदेश दिले. बँकेत त्रि-भाषिक सूत्राचा अवलंब केला जातो. त्यामुळे स्थानिक भाषेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे कन्नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष टी.एस. नागभरण यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: