नवी दिल्ली : चुकीच्या पद्धतीनं पार्क केलेल्या किंवा नो पार्किंगमधील कारचा फोटो काढून पाठवल्यास आता तुम्हाला 10 टक्के दंडाची रक्कम मिळणार आहे. केंद्रीय दळणवळण आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील त्यांच्या संसदेतील कार्यालयाबाहेरील पार्किंगमध्ये बेशिस्त पद्धतीनं कार पार्क केलेल्या पाहून हा मोठा निर्णय घेतला आहे.


नितीन गडकरींनी देशातील जनतेला आवाहन केलं आहे की कोणतीही कार रस्त्यावर चुकीच्या पद्धतीनं पार्क केली असेल किंवा नो पार्किंगमध्ये कोणतीही कार दिसली, तर त्याचा फोटो काढून वाहतूक पोलिसांना पाठवा आणि वसूल केलेल्या दंडातील 10 टक्के रक्कम मिळवा. चुकीच्या पद्धतीनं पार्क केलेल्या गाडीवर 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे साहजिकच त्यातील 50 रुपये फोटो पाठवणाऱ्या व्यक्तीला दिले जातील.

दरम्यान मे 2016 मध्ये नितीन गडकरींनी आपल्या कार्यालयासमोरच्या पार्किंगचा विषय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडेही पाठवला होता. मात्र त्यानंतर तब्बल 9 महिन्यांनतर ऑटोमेटेड पार्किंग लॉटला मंजुरी देण्यात आली.

वाहतूक भवन ही पहिली सरकारी इमारत असेल ज्यात ऑटोमेटेड मल्टीलेव्हल पार्किंगची सुविधा असेल. 9 कोटी रुपये खर्चून हा पार्किंग लॉट बांधला जाणार आहे.