गोवा : विधानसभा निवडणुकीत गोव्यात शिवसेनेचा दारुण पराभव झाला असतानाही, शिवसेनेने गोव्यातून माघार घेतली नाही. गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना लढवणार आहे. शिवसेनेचे खासदार आणि गोव्याचे शिवसेना प्रभारी संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली. ते पणजीत बोलत होते.
“गोव्यात शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीचे काम सुरु आहे. शिवसेना सुभाष वेलिंगकर यांना विश्वासात घेऊन गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा लढवण्या बरोबर गोव्यात प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावेल.”, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.
परिमल पंडीत आणि 100 कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश दिल्यानंतर राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना गोव्यात विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला आपली भूमिका नीट बजावता येत नसल्याचा आरोप केला. शिवसेना गोव्यातील लोकांना भेडसावणारे विषय घेऊन विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
गोव्यात आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने इथल्या लोकांना अनेकदा उपचारासाठी मुंबई, बेळगाव किंवा इतर शहरात जावे लागत असल्याचे सांगून राऊत म्हणाले, “शिवसेना गोव्यात फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका देऊन सामाजिक बांधीलकी जोपासणार आहे.” शिवाय, नवरात्री दरम्यान आरोग्य शिबिरे घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ऑक्टोबर महिन्यात उद्धव ठाकरे गोव्यात येऊन पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती राऊत यांनी यावेळी दिली.
पणजी पोटनिवडणुकीत भाजपच्या मनोहर पर्रिकर यांना कमी मताधिक्य मिळाले असल्याने ही बाब आश्चर्यकारक असल्याचे राऊत म्हणाले.
भाजप सरकार विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर होत असून असल्या दबावाला शिवसेना बळी पडणार नाही असे राऊत यांनी स्पष्ट केले.
सेना गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा लढवणार, मोर्चेबांधणी सुरु
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Sep 2017 07:21 PM (IST)
ऑक्टोबर महिन्यात उद्धव ठाकरे गोव्यात येऊन पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती राऊत यांनी यावेळी दिली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -