नवी दिल्ली : कोरोना संकटाला तातडीनं राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, राज्यांना हे संकट झेलण्यासाठी तातडीनं मदत करा अशी मागणी देशातल्या विरोधी पक्षांनी एकत्रितपणे केली आहे. कोरोनाच्या संकटकाळात पहिल्यांदाच विरोधी पक्षांची एकत्रित बैठक आज पार पडली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात देशातल्या 22 पक्षांनी यात सहभाग घेतला. त्यातही सर्वात लक्षणीय उपस्थिती होती शिवसेनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची.


काँग्रेसच्या बैठकीत शिवसेनेची उपस्थिती हा प्रकार राजकीय इतिहासात यानिमित्तानं पहिल्यांदाच घडला. महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेत शिवसेना काँग्रेस एकत्रित आल्यानंतर आता राष्ट्रीय पातळीवर शिवसेना एनडीएकडून यूपीएकडे प्रवास करतेय का असा प्रश्न यानिमित्तानं चर्चिला जातोय. या बैठकीला समाजवादी पक्ष, बसपा, आम आदमी पक्ष यांनी मात्र पाठ फिरवली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारच्या लॉकडाऊनबद्दलच्या धोरणांबद्दल कडाडून हल्ला चढवला.


काँग्रेससह अनेक समविचारी पक्षांनी या संकटाच्या काळात गरिबांना आधार देण्यासाठी थेट मदतीची मागणी केली, पण सरकारनं त्याकडे कानाडोळा केला. शिवाय मजुरांचे हाल होऊ नयेत यासाठी बसेस, रेल्वेला परवानगी देण्याची मागणी विरोधक सातत्यानं करत होते. पण सरकारनं त्याहीबाबत निर्णय वेळेवर न घेतल्यानं मजुरांचे प्रचंड हाल झाले असं सोनिया गांधींनी म्हटलं. अर्थव्यवस्थेची घसरणी ही केवळ कोरोनामुळे आलेली आपत्ती नाही, तर सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे 2017 च्या मध्यापासूनच त्याची सुरुवात झाली होती. गेल्या सात तिमाहींमध्ये जीडीपी सातत्यानं घसरतोय हे त्याचंच लक्षण आहे असा हल्लाबोल सोनिया गांधींनी केला. माजी पंतप्रधान आणि जेडीएस नेते एच डी देवेगौडा, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, डीएमके नेते एम के स्टॅलिन, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.


BJP Mumbai Protest | भाजपचं 'माझं अंगण रणांगण' आंदोलन, मुंबईत दिग्गज नेत्यांची हजेरी