मुंबई : देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये आरबीआयने मोठा दिलासा दिला आहे. कर्ज न भरण्याची मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कर्जदारांना हा दिलासा देण्यात आल्याची माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये  40 बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली आहे. दरम्यान 2020-21 या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी शून्याच्या खाली जाण्याचा अंदाज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आज त्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यांनी यावेळी सांगितलं की. रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे. रेपो रेट 4.4 टक्क्यांवरुन 4 टक्क्यांवर आणला आहे. या कपातीमुळे कर्जावरील व्याज कमी होणार असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितलं.

देशाचा जीडीपी शून्याच्या खाली जाण्याचा अंदाज 

शक्तिकांत दास यांनी सांगितलं की, रिव्हर्स रेपो रेटमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के कायम राहणार आहे. महागाई दर नियंत्रणात राहील अशी आरबीआयला अपेक्षा आहे, असं दास यांनी सांगितले. 2020-21 या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी शून्याच्या खाली जाण्याचा अंदाज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

जगाचा प्रवास मंदीच्या दिशेने सुरु 

लॉकडाऊनमुळे बाजारातील मागणीत घट आली आहे. संपूर्ण जगाचा प्रवास मंदीच्या दिशेने सुरु आहे, असंही ते म्हणाले.  सर्वच क्षेत्रांना कोरोना व्हायरसमुळं मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनचा सेवा क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. बाजारातील मागणीतही 60  टक्क्यांची घट झाली आहे, असं ते म्हणाले.

कृषी क्षेत्राकडून मोठ्या अपेक्षा

यावेळी डाळीच्या वाढत्या किंमती हा चिंतेचा विषय असल्याची माहितीही त्यांनी दिली, महागाईवर नियंत्रण ठेवण्याचं मोठं आव्हान आपल्यासमोर असल्याचं ते म्हणाले. दरम्यान मान्सूनच्या सकारात्मक अंदाजामुळं कृषी क्षेत्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत, असं देखील ते म्हणाले.

ऑगस्टपर्यंत कर्जाचा हप्ता न भरण्याची मुभा 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य लोकांवर कर्जाच्या हप्त्याचं ओझं वाढू नये यासाठी ते भरण्याची मुभा तीन महिन्यांसाठी देण्यात आली होती. ती मुदत आता आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. आधी मार्च, एप्रिल, मे साठी ही सवलत देण्यात आली होती. आता आणखी तीन महिन्यांसाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे. जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत कर्जाचा हप्ता न भरण्याची मुभा असेल, असं शक्तिकांत दास यांनी सांगितलं.