नवी दिल्ली : नवं सरकार बनलं आहे, मंत्रिमंडळ स्थापन झालं आहे आणि आता सरकारचं कामकाजही सुरु झालं आहे. पण संसदेच्या सभागृह कामकाज अद्याप सुरु झालेलं नाही. लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवडणूक अजून शिल्लक आहे. त्यातच आता दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे पक्ष त्या पदावर आतापासूनच आपला अधिकार सांगत आहे. भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेनेही या पदावर दावा केला आहे. हे पद आमचा अधिकार आहे आणि तो मिळायलाच हवा, अशी शिवसेनेची मागणी आहे.

लोकसभा उपाध्यक्ष पदाबाबत शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत आज (6 जून) म्हणाले की, "ही आमची मागणी नाही, हा आमचा नैसर्गिक दावा आणि अधिकार आहे. हे पद शिवसेनेलाच मिळायला हवं."


लोकसभा अध्यक्ष कोण?

यंदा हे पद बीजेडी किंवा वायएसआर काँग्रेस यांसारख्या पक्षांनाही मिळू शकतो, अशी चर्चा रंगल्यानंतर शिवसेनेने हा दावा केला आहे. याआधी एनडीएमधील भाजपच्या मित्रपक्षांनी गटनेतेपदाच्या बैठकीतील समावेशबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे जेडीयू पक्ष सरकारमध्ये सामील झालेला नाही.

लोकसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष निवडणूक अद्याप झालेली नाही. यंदा भाजपकडून मेनका गांधी, एस.एस. अहलुवालिया यांसारख्या ज्येष्ठ खासदारांपैकी कोणाची तरी लोकसभा अध्यक्षपदी निवड केली जाऊ शकते.

19 जून रोजी लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. त्याआधी 17 आणि 18 जून रोजी हंगामी अध्यक्ष नवनिर्वाचित खासदारांना शपथ देतील.

उपाध्यक्षपदावर कोणाचा अधिकार?

तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही चर्चा समोर आलेली नाही. लोकसभेचा उपाध्यक्ष कायमच विरोधी पक्षामधूनच निवडला जातो. ज्यात विरोधी पक्ष परस्पर सहमतीने या पदासाठी व्यक्तीची निवड करतात.

मात्र मागच्या वेळी मोदी सरकारने ही परंपराही बदलली. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात उपाध्यक्ष पद एआयएडीएमकेच्या एम.थंबीदुरई यांच्याकडे होतं. त्यावेळी विरोधकांनी आरोप केला होता की, "मोदी सरकारबाबत एआयएडीएमकेची भूमिका सौम्य आहे, त्यामुळेच त्यांना हे पद देण्यात आलं."

लोकसभेत कोणत्या पक्षाला किती जागा?

भाजप - 303
काँग्रेस - 52
डीएमके - 23
वायएसआर काँग्रेस - 22
टीएमसी - 22
शिवसेना - 18
जेडीयू - 16
बीजेडी - 12