मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर 4 ते 6 दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो. त्यामुळे सर्वत्र मान्सून केरळमध्ये कधी दाखल होणार याच्याच बातम्या दाखवल्या जातात. यंदा मान्सून खूपच लांबला आहे. अजूनही मान्सून केरळमध्ये पोहोचलेला नाही. परंतु मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे, हे कसे समजते? मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे निकष कोणते? असे प्रश्न अनेकांना पडतात. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे, हे ठरवण्यासाठी तीन प्रमुख निकष आहेत.
निकष पहिला
पाऊस (RAINFALL)–भारतीय हवामान विभागाची केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर 14 केंद्र आहेत, त्यातल्या 60 टक्के म्हणजे 8 ते 9 केंद्रावर सलग दोन दिवस किंवा दोन दिवसांपेक्षा जास्त वेळ 2.5 मिलिमीटर किंवा त्याहून अधिक पावसाची नोंद झाली तर मान्सूनची वर्दी समजली जाते, दुसऱ्या दिवशी हवामान विभाग मान्सून भारतभूमीवर आला अशी घोषणा करतं, मात्र त्यासाठी आणखी दोन निकष पाहिले जातात.
निकष दुसरा
वाऱ्याचं क्षेत्र (WIND FIELD)–पश्चिमी वारे ठराविक वेगाने (ताशी 25 ते 35 किलोमीटर) आणि ठराविक दाबाने (600 हेक्टोपास्कल) वाहत असेल तर मान्सूनच्या आगमनाला पुष्टी मिळते.
निकष तिसरा
बहिर्गामी दीर्घतरंग प्रारण अर्थात Outgoing Longwave Radiation (OLR)– थोडक्यात उपग्रहांच्या आधारे त्या ठिकाणी ठराविक उर्जा आणि उष्णता आहे हे समजणे महत्त्वाचे आहे.
VIDEO| येत्या दोन दिवसात मान्सून भारतात केरळात दाखल | ABP Majha
केरळात 1 जूनला आलेला मान्सून देशाच्या उत्तरेच्या बाजुने कसा पुढे सरकतो यावर त्याची प्रगती ठरते. मान्सूनचा पुर्वेकडील भाग ज्यावेळी ईशान्य भारतातच असतो, त्यावेळी म्हणजे 10 जूनपर्यंत मान्सूनची उत्तरी सीमा पाऊस घेऊन मुंबईत पोहोचलेली असते. दिल्लीत साधारण 29 जून ला पोहोचलेल्या मान्सूनचा वेग मंदावतो आणि पश्चिम राजस्थानपर्यंत पोहोचायला मान्सून तब्बल 12 दिवस घेतो. 1 जूनला केरळात दाखल झालेल्या मान्सूनने 15 जुलैपर्यंत मान्सूनने सर्व देश व्यापून टाकलेला असतो.