सूरतः उरी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसैनिकांकडून पाकिस्तानवर हल्ला केला जाईल, असं पत्र सूरतच्या शिवसैनिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. पाकिस्तानचा नायनाट करण्यासाठी आपण सुसाईड बॉम्बर बनण्यासाठीही तयार आहोत, असं शिवसैनिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.


... तर अवयवदान करुः शिवसैनिक

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तर जखमी जवानांसाठी शिवसैनिकांकडून अवयवदानही केलं जाईल, असं शिवसैनिकांनी म्हटलं आहे. आपत्कालीन स्थितीत शिवसैनिक अवयवदान करतील तसंच कोणत्याही मदतीसाठी सज्ज असतील, असं सुरतचे शिवसेना अध्यक्ष अरुण कलाल यांनी सांगितलं.

दोन्ही देशांमध्ये युद्ध झाल्यास जवानांना रक्ताची गरज पडू शकते किंवा जखमी झाल्यास अवयवांची गरजही पडू शकते. त्यामुळे जवानांना वाचवण्यासाठी शिवसैनिकांच्या शरीराचा वापर करावा, असं आवाहन शिवसैनिकांनी केंद्र सरकारला केलं आहे.

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे पत्र पंतप्रधान, संरक्षणमंत्री, राष्ट्रपती, गुजरातचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनाही दिलं आहे. महाराष्ट्रातील सेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन हा निर्णय घेतला आहे, असं सूरत शिवसेनेचे उपाध्यक्ष विलास पाटील यांनी सांगितलं.