Shiv Jayanti 2022 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी शिवरायांना वंदन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं आहे. पंतप्रधानांनी शिवरायांना वंदन करतानाचा एक फोटो शेअर करत म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे अतुलनीय नेतृत्व आणि समाजकल्याणासाठी त्यांनी केलेलं कार्य पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देत आहे. सत्य आणि न्यायाच्या मूल्यांसाठी उभे राहण्याच्या बाबतीत ते ठाम होते. त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 






राहुल गांधी यांच्याकडूनही शिवरायांना अभिवादन


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, वीर, पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन करतो. अहंकार आणि अन्यायाच्या विरुद्ध निडरता हेच सर्वात प्रभावी हत्यार आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.






शिवजयंतीसाठी काय आहे नियमावली?



छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल.  आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही शासनाकडून करण्यात आलं आहे.  शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली होती. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.