Tumour : 56 वर्षीय स्त्रीच्या शरीरातून डॉक्टरांनी तब्बल 47 किलो वजनाचा ट्युमर यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढला आहे. या शस्त्रक्रियेमुळे त्या महिलेला नवजीवन मिळाले आहे. अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने  यशस्वी शस्त्रक्रिया करत महिलेला नवीन जीवन दिले आहे. भारतात आतापर्यंत प्रथमच अंडाशयाच्या बाहेर असलेला सर्वात मोठा ट्युमर यशस्वीपणे बाहेर काढण्याची ही शस्त्रक्रिया पार पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सरकारी कर्मचारी आणि देवगढबारियाची रहिवासी असलेली ही महिला गेली 18 वर्षे स्वतःच्या शरीरात हा ट्युमर घेऊन जगत होती. गेल्या काही महिन्यांपासून अंथरुणाला खिळून राहिली होती. आठ डॉक्टरांच्या टीममध्ये चार सर्जन्स होते. मुख्य सर्जिकल गॅस्ट्रोएन्टरोलॉजीस्ट डॉ. चिराग देसाई यांनी ट्युमरच्या जोडीलाच या शस्त्रक्रियेदरम्यान साधारण सात किलोच्या आसपास ओटीपोटाच्या ऊती आणि अतिरिक्त त्वचाही काढून टाकली. शस्त्रक्रियेनंतर या महिलेचे वजन 49 किलो इतके खाली उतरले. शस्त्रक्रियेआधी ही महिला सरळ उभी राहू शकत नसल्यामुळे तिचे वजन करता येऊ शकले नव्हते.


“पोटाच्या पोकळीमध्ये ट्युमरमुळे निर्माण झालेल्या दाबामुळे या महिलेचे यकृत, हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि गर्भाशय यांसारखे अंतर्गत अवयव मूळ जागेपासून बाजूला झाले होते. त्यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती. ट्युमरच्या मोठ्या आकारामुळे सिटी स्कॅन यंत्राच्या साधनालाही अडथळा होत असल्यामुळे सिटी स्कॅन करणेही खूप कठीण बनले होते. पिळवटून गेलेल्या रक्तवाहिन्यांमुळे महिलेचा रक्तदाब अस्थिर होत होता आणि ट्युमर काढल्यानंतर रक्तदाब कमी झाल्यामुळे ती कोसळू नये यासाठी शस्त्रक्रियेच्या आधी तिला विशेष उपचार आणि औषधे देण्यात आली होती. या टीमचा एक भाग असलेले ऑन्को-सर्जन डॉ. नितीन सिंघल म्हणाले, “प्रजननक्षम वयात असताना फायब्रॉईड्स होणे ही अनेक स्त्रियांमध्ये आढळून येणारी गोष्ट आहे पण क्वचितच त्याचा आकार इतका मोठा होतो.” या टीममध्ये भूलतज्ञ डॉ.अंकित चौहान, जनरल सर्जन डॉ.स्वाती उपाध्याय आणि क्रिटिकल केअर स्पेशालीस्ट डॉ. जय कोठारी यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडल्या.


विशेष बाब म्हणजे, 18 वर्षांपूर्वी पासूनच या महिलेला हा त्रास सुरु झाला. पोटाच्या भागात अचानकपणे कोणतेही स्पष्टीकरण देता येणार नाही असे वजन वाढायला सुरुवात झाली. सुरुवातीला तिने आयुर्वेदिक उपचार करून बघितले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. 2004 मध्ये तिने सोनोग्राफी केली आणि त्यात ट्युमर असल्याचे दिसून आले तेव्हा कुटुंबाने शस्त्रक्रिया करण्याचा पर्याय निवडला. पण जेव्हा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करायला सुरुवात केली तेव्हा तो ट्युमर अंतर्गत अवयवांना जोडला गेल्याचे दिसून आले. त्यात असलेला धोका बघून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया थांबवली आणि तो ट्युमर तिच्या शरीरात आहे तसाच राहिला होता. 14 फेब्रुवारी 2022 रोजी त्या महिलेवर अपोलो रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.