नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच्यावर शासकीय इतमामात अत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीच्या निगम बोध घाटवर त्यांचा अंत्यविधी पार पडला. यावेळी सोनिया गांधी, प्रियंका गांधी, अहमद पटेल यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित होते.
शीला दीक्षित यांना श्रद्धांजली वाहन्यासाठी दिग्गज नेते, दिल्लीकर आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मागील आठवड्याभरापासून दीक्षित यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे त्यांना दिल्लीच्या एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल त्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही दीक्षित यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहिली.
शीला दीक्षित तब्बल 15 वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. तसेच काही महिने त्यांनी केरळचे राज्यपालपददेखील भूषवले होते. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दीक्षित यांनी पूर्वी दिल्ली मतदार संघातून निवडणूक लढवली होती. परंतु या निवडणुकीत त्यांच्या पराभव झाला.
सलग तीनवेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री
शीला दीक्षित यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा प्रदिर्घ अनुभव होता. 1998 पासून सलग तीन वेळा त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर निवडून आल्या. त्यांनी एकूण 15 वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले. परंतु 2013 साली दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात पराभव केला. तसेच आपने दिल्लीत सत्ता काबीज केली.
अनेग दिग्गज नेत्यांनी दीक्षित यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी ट्विटरद्वारे दीक्षित यांना आदरांजली वाहिली.