मुंबई : बांग्लादेशच्या (Bangladesh) सार्वत्रिक निवडणुकांमध्ये (Election) शेख हसीना (Sheikh Hasina) यांचा विजय झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बांग्लादेशच्या 300 जागांसाठी निवडणूक लढवण्यात येते. पण यंदा 299 जागांसाठी निवडणूक लढवण्यात आली होती कारण एका उमेदवाराच्या निधनामुळे त्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. त्यापैकी 223 जागांवर शेख हसीना यांच्या आवामी लीग या पक्षाला विजय मिळाला. त्यामुळे आता पाचव्यांदा त्या बांग्लादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील.
दरम्यान पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या निवडणुकांमधील विजयानंतर भारताचा उल्लेख हा खरा मित्र म्हणून केलाय. तसेच भारत आणि बांग्लादेशचे संबंध खूप चांगले असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. यावर बोलताना शेख हसीना यांनी म्हटलं की, भारत बांग्लादेशाचे खूप चांगेल संबंध आहेत. त्यांनी 1971 आणि 1975 मध्ये आपली साथ दिली होती. आम्ही भारताला शेजारी मानतो. तसेच भारत आणि बांग्लादेशमध्ये असलेले संबंध नव्या येणाऱ्या काळात नव्या उंचीवर पोहचतील असा विश्वास देखील शेख हसीना यांनी म्हटलं.
शेख हसीना होणार पाचव्यांदा पंतप्रधान
बांग्लादेशमध्ये शेख हसीना पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. पाचव्यांदा शेख हसीना पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पक्ष अवामी लीगनं 300 जागांपैकी दोनतृतीयांशपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. 2009 पासून बांग्लादेशची सत्ता शेख हसीना यांच्याकडेच आहे. त्यापूर्वी 1991 ते 1996 या काळात शेख हसीना पंतप्रधान होत्या.
विरोधी पक्षांचा निवडणुकांवर बहिष्कार
याआधी रविवारी सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान हिंसाचाराच्या तुरळक घटनाही घडल्या होत्या. बांगलादेशातील प्रमुख विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि त्यांच्या मित्रपक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. मतदान संपल्यानंतर रविवारीच मतमोजणी सुरू झाली. मुख्य निवडणूक आयुक्त काझी हबीबुल अवल यांनी सांगितले की, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 40 टक्के मतदान झाले होते, परंतु आता हा आकडा बदलू शकतो.
बांग्लादेशमध्ये एक संसद आहे, ज्याला राष्ट्रीय संसद म्हणजेच हाऊस ऑफ द नेशन म्हणतात. या संसदेत 350 सदस्य आहेत. या 350 सदस्यांपैकी 300 सदस्य मतदानाद्वारे निवडले जातात आणि 50 जागा महिलांसाठी मतदानाच्या आधारावर राखीव आहेत. आता, बांगलादेशमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी, कोणत्याही राजकीय पक्षाला 151 जागा जिंकणे आवश्यक आहे आणि या देशात दर पाच वर्षांनी संसदीय निवडणुका होतात.