मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे लक्षद्वीपच्या (Lakshdweep) दौऱ्यादरम्याचे काही फोटो शेअर केले. त्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) एकच धुमाकूळ सुरु झाला. त्यातच मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या टीप्पणीमुळे प्रकरण आणखीनच गंभीर झाले. मालदीवच्या सरकाने टीप्पणी करणाऱ्या मंत्र्यांचे जरी निलंबन केले असले तरीही भारतीयांचा राग काही केल्या शांत होत नसल्याचं पाहायला मिळालं. 


या सगळ्याचा सर्वात जास्त परिणाम हा मालदीवच्या पर्यटनावर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पर्यटन हा मालदीवच्या जीडीपीमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पण सध्या भारतात #BoycottMaldives ट्रेंड करत आहे. त्यामुळे लोकांनी मालदीवच्या फ्लाईटचे बुकींगच थेट रद्द केले आहे. त्याचवेळी कंपन्यांनी आता लक्षद्वीप फिरण्यासाठी फ्लाईटच्या तिकीटांवर बंपर डिस्काऊंट दिलाय. त्यामुळे लोकांनी त्यांचे मालदीवचे फिरणे रद्द करुन लक्षद्वीपला पसंती दिली आहे. 






मालदीव फिरण्यासाठी कुठलेही नवीन बुकींग नाही 


बिजनेस टुडेच्या अहवालानुसार, पर्यटनासाठी नागरिक प्रामुख्याने मालदीवला पसंती देतात. पण सध्या भारतीय पर्यटकांकडून मालदीवसाठीचे बुकींग रद्द केले जात आहे. मालदीवकडून पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर झालेल्या टीप्प्णीनंतर #BoycottMaldives हे ट्रेंड झाले. याचा परिणाम सोशल मीडियावरुन स्पष्टपणे दिसून येतोय. तसेच सध्या तरी मालदीवच्या ट्रीपसाठी कोणत्याही प्रकारचे नवीन बुकींग किंवा त्यासाठी विचारणा होत नसल्याचं टुरिस्ट कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच मोठ्या प्रमाणावर लोकं त्यांची मालदीवची टूर रद्द देखील करत आहेत. 


सोशल मीडियावरुन लोकांचा आक्रोश


मालदीवच्या युवा मंत्रालयात, उपमंत्री मरियम शिउना, मलशा शरीफ आणि अब्दुल्ला महजूम मजीद यांनी पीएम मोदींबद्दल अशोभनीय टिप्पणी केली. त्यामुळे अनेक मोठ्या व्यक्तींसह भारतीयांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर मालदीववर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले. सोशल मीडियाच्या माध्यामातून लोक त्यांचा रोष व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच आधी मालदीवसाठीचे बुकींग केलेल्या अनेकांनी त्यांचे बुकींग रद्द करत लक्षद्वीपसाठी बुकींग केल्याचं सांगितलं आहे. या सगळ्याचा सर्वात जास्त परिणाम हा मालदीवच्या पर्यटनावर होत आहे. 


EaseMy Trip वेबसाईटने रद्द केले सर्व बुकींग


बायकोटचा सर्वात विपरित परिणाम हा मालदीवच्या पर्यटनावर झालाय. त्यामुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेवर देखील याचे परिणाम येणाऱ्या काळात दिसून येतील. EaseMy Trip या ट्रॅव्हल कंपनीने मालदीवसाठीचे सर्व बुकींग रद्द केल्याची माहिती दिली आहे. 






हेही वाचा : 


Maldives : मोदींवर अवमानजनक वक्तव्य करणं पडलं महागात, मालदीवच्या तीन मंत्र्यांना पदावरून हटवलं