नवी दिल्ली: लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल के पटेल यांनी पदभार हाती घेतल्यापासून एकाधिकारशाहीप्रमाणे काम करायला सुरु केलं असून ते लोकांना विश्वासात घेत नाहीत, लक्षद्वीपच्या या समस्येतून मार्ग काढण्यासाठी आपण खासदार मोहम्मद फैजल यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. 


यावेळी लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल म्हणाले की, "लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल के पटेल यांच्या विरोधात या आधीपासूनच एकाधिकारशाही आणि लोकविरोधी निर्णय घेतल्याच्या तक्रारी आहेत. त्यांनी अनेक नियम एकतर्फी बदलले आहेत. लक्षद्वीपच्या प्रशासकांकडून या भागातील लोकांचे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय वास्तव लक्षात न घेता लक्षद्वीप डेवलपमेंट अथोरिटीच्या माध्यमातून नियम केले जात आहेत. त्यामुळे केवळ रिअल इस्टेट क्षेत्रातील काही लोकांचे हितसंबंध जपले जात असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासकांच्या या कृतीमुळे या संपूर्ण बेटालाच धोका निर्माण झाला आहे.


खासदार मोहम्मद फैजल पुढे म्हणाले की, प्रफुल्ल के पटेल यांनी लक्षद्वीपच्या प्रशासनाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर अनेक समस्या निर्माण झाल्या. वर्षांनुवर्षे या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या जमिनींच्या प्रश्नांबाबत त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जातात. त्यामुळे मी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांना पंतप्रधानांची भेट घेण्याची आणि या ठिकाणच्या प्रश्नांबाबत त्यांच्यासोबत चर्चा करायची विनंती केली.


प्रफुल्ल के पटेल यांची केंद्र सरकारने 5 डिसेंबर 2020 रोजी लक्षद्वीपचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली. प्रफुल्ल पटेल यांची ओळख म्हणजे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी गृहमंत्री म्हणूनही काम केलं आहे. 


पंतप्रधानांसोबत अनेक विषयांवर चर्चा केली. त्या विषयांसंबंधिच्या समस्या सोडवण्यासाठी पंतप्रधानांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये आज संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये याआधी गेल्या वर्षी 17 जुलै रोजी भेट झाली होती. त्यावेळी देखील विविध मुद्यांवर चर्चा झाली होती. सध्या महाराष्ट्रात सुरू महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणा यांच्यात संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आले होते.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - 


ABP Majha