Sharad Pawar Meet PM Modi: केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या विरोधात कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर अनेक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यामागील कारण स्वत: शरद पवार सांगणार आहेत. शरद पवार आज सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
दोन्ही नेत्यांमध्ये संसदेतील पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोघांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये याआधी मागील वर्षी 17 जुलै रोजी भेट झाली होती. त्यावेळी देखील विविध मुद्यांवर चर्चा झाली होती. मात्र, महाराष्ट्रात सुरू महाविकास आघाडी सरकार आणि भाजप, केंद्रीय तपास यंत्रणा यांच्यात संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची ही वन टू वन भेट झाली. दोघांमध्येच 20 ते 25 मिनिटं चर्चा झाली. भेटीचा विषय नेमका समजू शकलेला नाही. पण राजकीय चर्चा झाली असल्याची दाट शक्यता आहे. राज्यातील परिस्थितीबाबत ही चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट होते तेव्हा त्याची कायम चर्चा होते. आजच्या भेटीचं टायमिंगही महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी, ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली होती. त्याआधी सकाळीच राज्य सरकारने ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात असलेल्या कथित आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते समजले जाणारे अनिल देशमुख आणि नवाब मलिकदेखील तुरुंगात आहेत.
अजित पवार काय म्हणाले ?
शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. अजित पवार म्हणाले की, "मी शिर्डी परिसरात आहे. त्यामुळे जोपर्यंत माहिती घेत नाही, तोपर्यंत बोलणं उचित नाही, पण देशाचे पंतप्रधान आणि एका पक्षाचे राष्ट्रीय नेते विकासकामांबाबत भेटू शकतात. काही महत्त्वाचे प्रश्न असतात त्यात चर्चा करावी लागते, तसे काही प्रश्न असू शकतात. दोन्ही मोठे नेते आहेत. त्यांच्यात काय विषय झाला मला माहित नाही."