Sharad Pawar Meets PM Modi : केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या विरोधात कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये संसदेतील पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोघांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये याआधी मागील वर्षी 17 जुलै रोजी भेट झाली होती. त्यावेळी देखील विविध मुद्यांवर चर्चा झाली होती. मात्र, महाराष्ट्रात सुरू महाविकास आघाडी सरकार आणि भाजप, केंद्रीय तपास यंत्रणा यांच्यात संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची ही वन टू वन भेट झाली. दोघांमध्येच 20 ते 25 मिनिटं चर्चा झाली. भेटीचा विषय नेमका समजू शकलेला नाही. पण राजकीय चर्चा झाली असल्याची दाट शक्यता आहे. राज्यातील परिस्थितीबाबत ही चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट होते तेव्हा त्याची कायम चर्चा होते. आजच्या भेटीचं टायमिंगही महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी, ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली होती. त्याआधी सकाळीच राज्य सरकारने ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात असलेल्या कथित आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते समजले जाणारे अनिल देशमुख आणि नवाब मलिकदेखील तुरुंगात आहेत.
शरद पवार यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन
मंगळवारी रात्री शरद पवार यांच्या घरी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीत आमदारांच्या प्रशिक्षण शिबिरात उपस्थित असलेले राज्यातील आमदारांसह खासदारही उपस्थित होते. त्याशिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील हजेरी लावली होती. यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेत शरद पवार यांनी राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचे म्हटले होते. राज्य सरकार कोणत्याही परिस्थिती कोसळणार नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha