सोलापूर: दिल्ली हिंसाचारात शेतकरी आंदोलनाला बदनाम करणारे सत्ताधारी पक्षातील काही घटक असल्याचा आरोप माजी कृषी मंत्री शरद पवारांनी केला आहे. आमच्या घामाची किंमत आम्हाला मिळावी एवढीच मागणी आंदोलनातील शेतकऱ्यांची असल्याचंही ते म्हणाले.
माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील नान्नज येथे दत्तात्रय काळे यांनी विकसित केलेल्या किंग बेरी द्राक्ष वाणाचा लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यावेळी सुशीलकुमार शिंदेही उपस्थित होते. ड्रोनच्या माध्यमातून द्राक्ष वाणाचा लोकार्पण सोहळा पार पडण्यात आला.
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, "शेतकरी आपल्या मागणीसाठी गेले अडीच महिने दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत. किमतीच्या संदर्भात केंद्र सरकारने धोरण नीट आखावं अशी त्यांची मागणी आहे. आम्हाला फुकट काही नको, आमच्या घामाची किमंत द्या असं त्यांचं म्हणणं आहे. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांनी कुठेही कायदा हातात घेतला नाही."
दिल्ली हिंसाचारावर बोलताना शरद पवारांनी मोदी सरकारवर आरोप केले. ते म्हणाले की, "दिल्ली आंदोलनाच्या वेळी गडबड करणारे खरे शेतकरी नव्हते. त्यामागे शेतकरी आंदोलनाला बदनाम करणारे घटक होते, सत्ताधारी पक्षातील काही घटक होते. पंजाब, युपी, बिहार आदी राज्यातील शेतकरी टप्प्याटप्प्याने तेथे उपोषणाला बसले आहेत. खरेदीची आणि मालाची योग्य किंमत त्यांना मिळावी एकढीच मागणी शेतकऱ्यांची आहे."
शरद पवारांनी मला करंगळीला पकडून राजकारणात आणलं, आमच्यात अंतर नाही : सुशीलकुमार शिंदे
शरद पवार पुढे म्हणाले की, "गहू आणि तांदळाचे उत्पादन करणारे हे शेतकरी आहेत. आज त्या पिकाची खरेदी करण्यासाठी अन्न महामंडळ ही संस्था आहे. या संस्थेने शेतकऱ्यांच्या उत्पादनाची सर्व जबाबदारी घेतली पाहिजे. आमच्या काळात आम्ही सर्व खरेदी करत होतो. मधल्या काळात वेगळी मतं मांडली गेली, उत्पादनांची खरेदी व्यवस्थित झाली नाही."
शरद पवार म्हणाले की, "राज्यात काम करत असताना मी पुण्याचा कधी पालकमंत्री नव्हतो, मात्र सोलापूरचा पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. शेतीच्या क्षेत्रात क्रांती करणार गाव म्हणून नान्नजची ओळख आहे. माझ्याकडे शेती खात जेव्हा होत तेव्हा कमी पाण्यात येणार पीक म्हणून डाळींबचे संशोधन केंद्र सोलापुरात उभं केलं."
शेतकऱ्याना सल्ला देताना शरद पवार म्हणाले की, "शेतीच्या क्षेत्रात नावीन्यता कसं येईल, दर्जा कसा सुधारेल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. हे सगळं करत असताना जमीन कशी व्यवस्थित राहील ही गोष्टही लक्षात घ्यायला हवी."