सोलापूर: राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना शरद पवारांनी मला करंगळीला पकडून राजकारणात आणलं, दिल्लीत मी त्यांच्या सोबत सरकारमध्ये बसलो. आमच्यात कोणतंही अंतर नाही असे प्रतिपादन काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. ते सोलापूरातील द्राक्ष वाणाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.


माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील नान्नज येथे दत्तात्रय काळे यांनी विकसित केलेल्या किंग बेरी द्राक्ष वाणाचा लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यावेळी सुशीलकुमार शिंदेही उपस्थित होते. ड्रोनच्या माध्यमातून द्राक्ष वाणाचा लोकार्पण सोहळा पार पडण्यात आला. यावेळी आपल्या संपूर्ण भाषणात सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवारांचे कौतुक केलं आहे.


या वेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, "आजच्या कार्यक्रमाला शरद पवार येतील की नाही याबाबत शंका होती. नानासाहेब काळे यांच्या कार्यक्रमाला ते आले होते. आज त्यांचा मुलगा दत्तात्रय काळे यांच्याही कार्यक्रमाला आले. एवढा मोठा माणूस शेतकऱ्याच्या कार्यक्रमाला येतो, यातून देशाला एक संदेश जातो, शेतकऱ्यांची तपश्चर्या यामुळे देशात जाते." शरद रावांनी एकदा मनात आणलं तर बरोबर कार्यक्रम करतात अशी मिश्किलीही सुशीलकुमार शिंदे यांनी केली.


'होळकरांच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबियांचा डोळा', पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंह होळकरांची टीका


सुशील कुमार शिंदे म्हणाले की, "कृषी मंत्री म्हणून शरदराव मनमोहन सिंग सरकारमध्ये होते. शेतकऱ्यांना भाव कसा जास्त मिळेल यासाठी शरद पवारांनी प्रयत्न केले. त्यांनी तांदळाच्या उत्पादनासाठी केलेल्या प्रयत्नामुळे डोंगराळ भागातही तांदूळ पिकवला जाऊ लागला."


शरद पवारांच्या विषयी आठवणींना उजाळा देताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, "तुम्हाला वाटत असेल तर की आमच्यात अंतर आहे. मात्र आज त्यांनी दाखवून दिले आहे की आमच्यात कोणतंही अंतर नाही. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी मला सरकारमध्ये घेतलं नाही म्हणून मी शेतीच्या मार्गावर लागलो. आज जवळजवळ 34 एकर माझी शेती आहे. एखाद्याला पुढं रेटायचं, त्याचं गुणगान करायचं यात शरदरावांचा हात कोणी धरु शकत नाही. एखाद्याच्या विषयी त्यांनी मनात घेतलं तर ते पुढे ढकलतात."


1978 साली आम्ही एकत्र होतो असं सांगत सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, "शरदरावांनी मला निवडणुकीला उभं केलं आणि पैसेही दिले. त्यांनी दिलेले 20 हजार रुपये मी परत द्यायला गेलो तेव्हा त्यांनी ते मला परत पाठवले. आज मी जो काही आहे ते शरद पवारांच्यामुळेच."


उदयनराजेंकडून शरद पवारांची भेट घेण्यामागचं मूळ कारण उघड