नवी दिल्ली: या वर्षीचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. त्या लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलत होत्या. देशात सुरु असलेल्या सुधारणांचा उद्देश हा भारताला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणे हा आहे असेही त्या म्हणाल्या.

Continues below advertisement


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "कोरोनाचे एवढं मोठं संकटही सरकारला आपल्या सुधारणांचा कार्यक्रम राबवण्यासाठी आळा घालू शकलं नाही. अनेक तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारताचा उद्देश साध्य करण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्वाची भूमिका बजावेल."


निर्मला सीतारमण पुढे म्हणाल्या की, "जगातील अनेक देशांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरु आहे. पण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारने यावर मात करुन सातत्याने अर्थव्यवस्थेचा विकास साधला आहे."


देशाची प्राथमिकता संसदेची नवी इमारत नसून सुसज्ज असं सार्वजनिक हॉस्पिटल असायला हवं: डॉ. अमोल कोल्हे


प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसवर टीका करताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "स्वातंत्र्यानतर अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या पक्षाने 1991 साली आर्थिक सुधारणांचा विचार केला. आणि आता तेच या सरकारला सुधारणांच्या मुद्द्यावरुन सातत्याने प्रश्न विचारतात."


अर्थमत्री पुढे म्हणाल्या की, "राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात शेतकरी आणि संपत्ती निर्माण करणाऱ्या उद्योगपतींची गोष्ट केली. या उद्योगपतींच्या योगदानाशिवाय अर्थव्यवस्था कशी चालेल? या अर्थसंकल्पामध्ये कृषीवरील खर्चात कपात का करण्यात आली आहे असा सवाल सातत्याने विचारण्यात येतोय. पण ही गोष्ट दिशाभूल करणारी आहे. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 10.75 कोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात 1.15 लाख कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले आहेत."





केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेतलेल्या 77 सदस्यांचेही आभार मानले. या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित होते.


शेतकरी, जवान नाही तर मोदी सरकारसाठी काही उद्योगपती देव; राहुल गांधींचा हल्लाबोल