Shaheed Din Bhagat Singh:  भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या संघर्षात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्य चळवळीत समाजातील अनेक घटकांनी आपल्या परीने योगदान दिले. स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अवघ्या 23 व्या वर्षी भगत सिंह फासावर गेले. भगत सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे स्वातंत्र्यानंतर साध्य करण्यासाठीच्या उद्दिष्टांचा एक कार्यक्रम होता. भगत सिंह यांची वैचारीक भूमिकाही ठाम होती. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या कार्यक्रमातही त्याचे प्रतिबिंब दिसत होते.  


भगत सिंह यांनी बरेच लिखाण केले. काही वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून लेख लिहीले. तर, कारावासात असताना त्यांनी काही लेख लिहिले. हे लेख तत्कालीन परिस्थितीवर असले तरी त्यातील बरेच मुद्दे आजच्या काळातही लागू होत असल्याचे दिसून येते. 


>> जाणून घेऊयात भगत सिंह यांचे 10 मौलिक विचार: 


- क्रांती ही जनतेसाठी असली पाहिजे आणि जनताच पूर्ण करील. संपूर्ण समाजव्यवस्था परिवर्तन करणे म्हणजे क्रांती होय.


- क्रांतीसाठी रक्तपात करणारा आवश्यक नाही आणि क्रांतीत व्यक्तिगत प्रतिहिंसेला स्थान नाही. क्रांती ही बॉम्ब आणि पिस्तुलांची क्रांती नाही. 


- देशातील साहित्याचा प्रवाह ज्या दिशेने वाहतो, नेमक्या त्याच दिशेने तो देश आगेकूच करतो. कोणत्याही मानवजातीच्या उद्धारासाठी उच्च दर्जाच्या साहित्याची आवश्यकता असते. लेखकांनी सामाजिक समस्या, तसेच परिस्थिती यानुसार साहित्य निर्माण केले नाहीतर समाजाच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या समाजसुधारक आणि राजकीय नेते यांचे प्रयत्न निष्फळ ठरतील.


- युवकाने ठरवले तर तो मानवजातीचे उद्बोधन करू शकतो. देशाची अब्रू वाचवू शकतो. शोषितांच्या आणि जगाच्या उद्धाराची सूत्रे त्याच्या हाती आहेत. युवक हा जगाच्या रंगपटावरील सिद्धहस्त खेळाडू आहे. 


- जर देशवासियांना आमच्या मृत्यूचे थोडेफार दुख: होत असेल तर त्यांनी जमेल तसे हिंदू-मुस्लिम ऐक्य स्थापन करावे. तीच आमची अंतिम इच्छा होती. तेच आमचे स्मारक असेल. 


- समाजात होणाऱ्या दडपशाहीविरोधात कोणता आवाज उठत आहे आणि चिरस्थायी शांतता स्थापन करण्यासाठी कोणते विचार मांडले जात आहेत, हे नीट समजून घेतले नाहीत, तर माणसाचे ज्ञान अपूर्ण राहते. 


- भांडवलदारांना आपआपला स्वार्थ साधण्यासाठी धर्माचा उपयोग केला आहे, इतिहास याला साक्ष आहे.


- साधारणपणे आजपर्यंतच्या सर्व धर्मांनी माणसांना परस्परांपासून दूर केले आहे. जगात धर्माच्या ठेकेदारांनी धर्माच्या नावावर जेवढा रक्तपात केला आहे, तेवढा कदाचित दुसऱ्या कोणी केला नसेल. धर्माच्या आश्रयाने या पृथ्वीवरील स्वर्ग उजाड करून टाकला आहे. जो धर्म माणसाला माणसापासून दूर करतो, प्रेमाऐवजी परस्परांचा तिरस्कार करायला शिकवतो. अंधश्रद्धांना उत्तेजन देऊन लोकांच्या बौद्धिक विकासाला बाधक ठरतो.  तो माझा धर्म होऊ शकत नाही. 


- आपल्या देशात अस्पृश्यतेचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अस्पृश्यांच्या स्पर्शाने धर्म भ्रष्ट होईल, मंदीर प्रवेशाने देव नाराज होतील, विहिरीतून पाणी घेतले की पाणी अपवित्र होते. विसाव्या शतकात केले जाणारे हे प्रश्न ऐकून लाज वाटते


- प्रेम हे स्वत: च एक भावना असण्यापेक्षा अधिक काही असत नाही आणि ही पशूवृत्ती नाही. ती मधूर मानवी भावना आहे. प्रेम हे नेहमी मानवी चारित्र्याला उंचीवर नेते, कधी मान खाली पाहायला लावत नाही. पण, त्यासाठी अट एकच आहे, प्रेम हे प्रेम असले पाहिजे.